शेडगेंची बदली व कंपनीवर गुन्हे दाखल न केल्यास उपोषणाचा इशारा
शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर या कंपनीला सतरा डिसेंबर रोजी अचानक आग लागून कंपनीचे कोट्यावधीचे नुकासान होत तीन कामगार जखमी झाले. त्यामुळे सदर कंपनीच्या कारखानदारावर कामगारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची व कारखान्याला बेकायदेशीर कवच देणारे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांची तात्काळ बदली करा अन्यथा उपोषण आंदोलन करण्याचा इशारा वढू बुद्रुकच्या ग्रामस्थांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन देत दिला आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर या कंपनी कडे ग्रामपंचायतचे २ लाख ५१ हजार १३७ रुपये कर थकीत असून ग्रामपंचयातीचे वतीने तो कर भरण्याचा कागदोपत्री पाठपूरावा करीत असताना, वढू बुद्रुक येथील एका जमिनीच्या गटात कंपनीकडून अतिक्रमण झाल्याची तक्रार सचिन हरिभाऊ भंडारे यांनी केली. त्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर कंपनीकडे पाठपूरावा करुन सुचनापत्र देवून सदर अतिक्रमण दूर करावे व अग्निशमन यंत्रणा सुरक्षेच्या दृष्ठीने कार्यान्वित करण्याच्या वारंवार सुचना करुनही कंपनी प्रशासनाने कोणती हि कार्यवाही केली नाही. त्यामुळे सदर दुर्घटना घडली असल्याचे सरपंच सारीका शिवले यांनी सांगितले.
यावेळी वढू बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका शिवले, उपसरपंच राहुल ओव्हाळ, माजी सरपंच अनिल शिवले, ग्रामपंचायत सदस्य अंजली शिवले, कृष्णा आरगडे, माऊली भंडारे यांसह आदी उपस्थित होते. कंपनीत लागलेल्या आगीनंतर आग विझविण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा कंपनीकडे नसल्याने सर्व शासकीय विभागांना आग विझविण्याच्या कामी उतरावे लागले असून कंपनीच्या बेजबाबदारपणा मुळे परिसरातील गावे भितीच्या सावटाखाली होती.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन कंपनीवर जखमी कामगारांना जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच या कंपनीला गेली दोन वर्षे पाठीशी घालून त्यांना सुरक्षा यंत्रणा उभी करण्यापासून दूर ठेवणाऱ्या शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांची तात्काळ बदली करण्याच्या मागणीचे निवेदन पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कडून सदर कंपनीच लक्ष का?
वढू बुद्रुक (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक कंपन्या असून कोणत्याही कंपनीकडे अग्निशमन यंत्रणा तसेच अन्य सुरक्षेच्या यंत्रणा नाही. मात्र ग्रामपंचायत त्या कंपन्यांना काही बोलत नसताना फक्त सदर कंपनीच लक्ष का करत आहे असा देखील सवाल काही ग्रामस्थांना पडला आहे.
खंडणीच्या गुन्ह्याचे काय कनेक्शन…
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील आग लागलेल्या कंपनी कडे यापूर्वी कंपनीला त्रास देत कंपनी कडे खंडणी मागितल्या प्रकरणी सध्याच्या सरपंच सारिका शिवले यांचे पती अंकुश शिवले यांच्यासह एक माजी सरपंच व अन्य दोघांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खंडणीसह आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे या आंदोलनाच्या भुमिकेमध्ये खंडणीच्या गुन्ह्याचे काय कनेक्शन आहे हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.