शिरुर तालुक्यातील “पापा की परी” कडुन 300 पुस्तके भेट देऊन वडिलांचा वाढदिवस साजरा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): जगातील सगळ्यात अतुट नात असत ते म्हणजे वडील आणि मुलीच प्रेमळ नातं. मुली या नेहमी ‘पापा की परी’ म्हणजेच ‘बाबांची राजकन्या’ म्हणून ओळखल्या जातात. शिरुर तालुक्यातील दोन ‘पापा की परीं’नी वडिलांचा 75 वा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजापुढे एक आदर्श ठेवला असुन शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातून या दोन्ही मुलींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिरुर तालुक्यातील दिपाली शेळके आणि वैशाली थिटे या श्रीगोंदा तालुक्यातील माणिकराव शिवराम आढाव यांच्या दोन कन्या. या दोघींनी वडिलांचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले होते. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त 34 हजार रुपयांची 300 पुस्तके कोरेगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप पठारे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उत्पादन शुल्क मुंबई महाराष्ट्र राज्याचे माजी आयुक्त कांतीलाल उमाप, जातेगाव येथील छत्रपती संभाजी राजे विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे, नंदा ढेरे, होमेश्वरी चौरे, आदिती शहाणे, उपेंद्र चौरे, विवेक शेळके, यशराज थिटे, जयदत्त ढेरे, श्री. जी. चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत मान्यवर लेखकांची पुस्तके भेट दिल्यामुळे दोन्ही मुलींचे मान्यवरांनी मोठे कौतुक केले आहे. शिवाय या दोन्ही मुलींनी केलेल्या वाढदिवसामुळे वडील माणिकराव आढाव भारावून गेले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मला स्वतःचा वाढदिवस साजरा करणे आवडत नाही. पण माझ्या दोन मुलींनी माझ्या गावातील शाळेला पुस्तके भेट दिल्यामुळे खूप छान वाटले. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध लेखकांची पुस्तके वाचण्यास मिळणार असल्यामुळे त्यांच्याही ज्ञानात मोठी भर पडेल.

पुणे जिल्हा बाल रंगभूमी परिषदच्या जिल्हाध्यक्षा आणि अखिल भारतीय नाट्य परिषद शिरुर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके म्हणाल्या, वडील हे मुलीचे पहिले मित्र, संरक्षक आणि सूपरहीरो असतात. प्रत्येक वडील आपल्या मुलीसाठी लहानपणा पासूनच तिच्या प्रत्येक लहान लहान गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जेणे करून ती आनंदी राहावी. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हसू बघण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात.

आमच्या वडिलांनी लहान पणापासून प्रचंड कष्ट केले आहे. कष्टातून संसार उभा करताना आमच्यावर संस्कार केले आहेत. आम्हाला कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. यामुळे आम्हा दोघी बहिणींना वडिलांचा 75 वा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला जर पुस्तके भेट दिली तर अनेक विद्यार्थी घडू शकतील. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडले. आम्ही दोघी बहिणींनी पुस्तके गोळा करण्यास सुरवात केली आणि 300 पुस्तके शाळेला भेट दिली.

यावेळी बोलताना वैशाली थिटे म्हणाल्या, आमच्या वडिलांनी किर्लोस्कर आईल इंजिन, बाल भारती, एस एस सी बोर्ड, बाईफ डेव्हलपमेंट रिसर्च आणि उरुळी कांचन येथील मनी भाई देसाई यांच्या संस्थेत 43 वर्षे नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतरही कष्टाळूपणा, कामातील सचोटी, कामाविषयी असणारी निष्ठा असल्यामुळे पून्हा त्याच संस्थेने बोलावून वारजे येथील शाखेत 10 वर्ष पुन्हा सेवेची संधी दिली. त्यांच्यातील हेच गुण आमच्यात आले. अनावश्यक खर्च नाही, काटकसर याची आजही वडिलांकडून आम्हांला प्रेरणा मिळते.

मुलींच्या आयुष्यात वडिलांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. मुलींना “मदर्स डे” पेक्षा “फादर्स डे” ची उत्सुकता असते. त्यामुळे वडिलांना “फादर्स डे” च्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांची धडपड असते. आम्हा दोघी बहिणींना वडिलांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले असे त्यांनी सांगितले.

‘बायफ संस्थेच्या वतीने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जात होते. त्यामध्ये हॉलिबॉल, कबड्डी, कॅरम, बुद्धीबळ या खेळांमध्ये माणिकराव आढाव यांना नेहमीच बक्षिस मिळत. आजही ते नित्तनियमाने व्यायाम करत असून, 75 व्या वर्षीही युवकांना लाजवेल असा त्यांचा उत्साह असल्याचे आढाव यांच्या पत्नी प्रमिला आढाव यांनी बोलताना सांगितले. दरम्यान, शाळेला ३०० पुस्तके भेट देऊन वडिलांचा वाढदिवस साजरा केल्यामुळे दिपाली शेळके आणि वैशाली थिटे यांचे परिसरातून कौतुक होत आहे. कांतीलाल उमाप यांनी मुलींनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.