शिरुर पोलिसांना चोऱ्या रोखण्यात अपयश, तर्डोबाचीवाडी येथे घरफोडी करुन 3 लाख 22 हजारांची चोरी

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): गेल्या दिड वर्षात शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकलं करण्यात शिरुर पोलिसांना अपयश आलेले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी वाढतं आहे. शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तर्डोबाची वाडी येथे सोन्याचे दागिने तसेच रोख रकमेसह 3 लाख 22 हजार रुपयांची चोरी झाली असुन शिरुर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणार गुन्हे शोध पथक फक्त नावापुरतंच आहे का…? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (दि 16) रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तर्डोबाचीवाडी येथील गोरेमळा येथुन रोख रक्कम, सोने व इतर वस्तूंसह 3 लाख 22 हजारांचा ऐवज चोरीला गेला असुन याबाबत सतिश तुकाराम गोरे (वय 45 ) सध्या रा. यशवंत कॉलनी, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. तर्डोबाची वाडी गावच्या हद्दीत गोरेमळा येथे फिर्यादीचा भाऊ सुभाष तुकाराम गोरे यांच्या राहत्या घराचा किचनचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने घरफोडी करत चोरी केली असुन या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार करत आहेत.