ओडीसातून शिरुरकडे येणाऱ्या पाच जणांच्या गांजा तस्कर टोळीचा पर्दाफाश

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) मागील काही दिवसांपुर्वी पुणे -नगर महामार्गावर रांजणगाव MIDC पोलिसांना एका ट्रव्हल्समध्ये ४ किलो गांजा मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी या ट्रॅव्हल्सच्या चालकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. त्यानंतर पुन्हा बाहेरुन शिरुरमध्ये येणाऱ्या गांजा तस्करांचा पर्दाफाश सीमा शुल्क विभागाने सोलापूर येथे केला असुन त्यांच्याकडून तब्बल ५४ किलो वजनाचा १२ लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून यात शिरुरमधील एका महिलेसह एका तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे हा गांजा शिरुर तालुक्यात कोणकोणत्या ठिकाणी वितरीत होणार होता याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की,सोलापूर शहराच्या लगत सोलापूर ते तांदूळवाडी रस्त्यावर सीमा शुल्क खात्याच्या पथकाने दोन वाहनातून ५४ किलो वजनाचा १२ लाख रुपयांचा गांजा पकडला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली असुन ओडिसातून पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात येणाऱ्या गांजा तस्कर टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मागील काही दिवसांपासुन ओडिसा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी सुरु असल्याच्या माहितीवरुन सीमा शुल्क पुणे विभागाने ही कारवाई केली.

पुणे शहरात गांजा असलेली वाहने येणार आहेत. याची माहिती सीमा शुल्क खात्याच्या नार्कोटिक्स सेलला मिळाली होती. त्यानंतर पथकाने सापळा रचून दोन संशयित वाहने पकडली. तेव्हा या दोन वाहनांमध्ये गांजा आढळून आला. एकूण ५४ किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत १२ लाख रुपये एवढी आहे. यावेळी पथकाने दोन महिला व पाच जणांना अटक केली आहे.

त्यामुळे अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा या कारवाईतून पर्दाफाश करण्यात आला असुन या कारवाईत शाहनवाज शेख (रा. अहमदनगर), ज्योती गव्हाणे (शिरुर, जि.पुणे), फरझाना सय्यद (रा.अहमदनगर), सागर मुठेकर ( बारामती जि.पुणे) तसेच विश्वास गोरडे (शिरुर, जि.पुणे) यांना अटक करण्यात आली.

हे सर्व संशयित हातातील बॅगमध्ये गांजा लपवून मालवाहनातून शिरुरला जात होते. सीमाशुल्क खात्याचे आयुक्त यशोधन वनगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त ध्रुव शेषाद्री, उपायुक्त सचिन घागरे, अधीक्षक अभिषेक सिंह, दिनेश कुमार मीना, निरीक्षक अमित पटेल यांनी ही कारवाई केली. या कारवाईनंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेने शिरुर तालुक्यातील रांजणगाव, शिक्रापूर, शिरूर या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक ठिकाणी गांजा विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांची पाळेमुळे शोधून हे रॅकेट ऊद्ध्वस्त करणे गरजेचे आहे.