लंडनच्या संसद चौकात “जय शिवराय” चा जयघोष अँड संग्राम शेवाळे यांच्या पुढाकारातून शिवजयंती साजरी…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु लंडन येथे शिक्षणासाठी गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी आपला मराठी बाणा जपत त्यांच्या मित्र परिवारासोबत लंडन शहर संसद चौकात भारतीय विद्यार्थी व इतर देशातील विद्यार्थ्यांसोबत मिळून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी सर्व विद्यार्थांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या घोषणांनी लंडनचा संसदभवन परिसर दणाणून सोडला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगात परिचित असुन त्यांची युद्धनिधी आणि सर्वसमावेशक प्रशासकीय नैपुण्य यांमुळे शिवाजी महाराज हे जगातले आदर्श राजे ठरले आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या “गनिमी काव्याच्या” युद्धनीतीचा जगभरात अभ्यास केला जातो. त्यामुळे लंडन शहरात आपली भारतीय संस्कृती जोपासत भारतातील अनेक राज्यातील विद्यार्थी अँड संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यासाठी एकत्रित आले होते.

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशातील अभ्यासक भारतात येतात आणि हीच महाराष्ट्राची परंपरा आम्ही जोपासत शिवाजी महाराज यांना लंडन संसद चौकात वंदन केले अशी माहिती अँड संग्राम शेवाळे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना दिली. यावेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.