रांजणगाव MIDC त डंपर चोरीची फिर्याद देणारा मालकच निघाला चोर

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डंपर चोरी केल्याची फिर्याद बुधवार (दि 2) रोजी निळकंठ चंद्रकांत काळे (रा. तरडे, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिली होती. त्याच अनुषंगाने पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक मदतीच्या आधारे तपास केला असता एक धक्कादायक माहिती पुढे आली असुन फिर्याद देणाऱ्या मालकानेच डंपर चोरी केल्याचे उघड झाले आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि 2) रोजी निळकंठ काळे यांनी रांजणगाव MIDC हद्दीतून त्यांच्या मालकीचा एम एच 12 आर एन 4137 हा डंपर चोरी गेल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी तपासाची चक्रे फिरवत सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीच्या आधाराने चोरीला गेलेल्या डंपरचा शोध घेतला असता त्या डंपर पाठोपाठ एक पांढऱ्या रंगाची आय ट्वेंटी कार वेळोवेळी दिसुन आली.

त्यानंतर तपास पथकातील पोलिसांनी डंपर चोरीला गेल्याच्या ठिकाणापासुन ज्या मार्गाने डंपर गेला त्या मार्गाचे सी सी टी व्ही फुटेज तपासले असता फिर्यादीच्या गावाकडेच हा डंपर गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी फिर्यादीस ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इतर तीन मित्रांच्या मदतीने स्वतःच्या मालकीच्या डंपरची चोरी केल्याची कबुली दिली. फिर्यादी निळकंठ काळे याच्याकडुन सदरचा डंपर जप्त करण्यात आला असुन 1) निळकंठ चंद्रकांत काळे, (वय 29), 2) नाना बाळू गाढवे (वय 23), 3) मंदार रामचंद्र चौधरी (वय 20) तिघेही रा. तरडे, ता. हवेली, जि. पुणे 4) सुरज विजय पवार (वय 20), रा. तवरगल्ली, पाटस, ता. दौंड, जि. पुणे यांना (दि 8) रोजी अटक करण्यात आली असुन त्यांना आज (दि 9) रोजी न्यायालयात हजर केले असता. त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, वैभव मोरे, संतोष औटी यांनी केली असुन या गुन्ह्याचा पुढील तपास दत्तात्रय शिंदे करत आहेत.