शिरुर तालुक्यात चोवीस तासात दुसरा दरोडा…

क्राईम मुख्य बातम्या

बेट भागातील पिंपरखेडमध्ये दरोडा टाकत 5 लाख 87 हजार रुपयांची चोरी

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील दरोड्यांचे सत्र थांबत नसुन तर्डोबाची वाडी येथील गोरेमळा येथे मंगळवार (दि 16) रोजी रात्री 11 च्या सुमारास चोरट्यानी दरोडा टाकुन रोख रक्कम, सोने व इतर वस्तूंसह 3 लाख 22 हजारांचा ऐवज चोरीला गेलेला असतानाच गुरुवार (दि 18) रोजी पहाटे दोनच्या सुमारास पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील दाभाडेमळा परिसरात अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकत सुमारे 5 लाख 87 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेत पोबारा केला आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन गेल्या अनेक दिवसांपासून शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र वाढलेले आहे. मात्र अद्यापही या चोरीच्या घटनांमधील चोरट्यांना जेरबंद करण्यात शिरुर पोलिसांना अपयश आलेले दिसत आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरखेड येथील प्रदिप बाळू दाभाडे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. दाभाडे कुटुंबीय हे रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान जेवण करून आपापल्या खोलीत झोपलेले असताना मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी झालेल्या आवाजाने प्रदिप दाभाडे आणि त्यांची पत्नी पूजा जागे झाले. चोरट्यानी त्यांच्याजवळील असलेल्या कोयता, गलूर व दांडक्याचा धाक दाखवत हातातील कटावणीने कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील दागिने आणि प्रदीप यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने काढून दे असा दम देत दागिने काढून घेतले. तसेच शेजारील खोलीत झोपलेले दाभाडे यांचे आतेभाऊ निलेश डुकरे, भाऊ राहुल दाभाडे आणि भावजय अनुजा दाभाडे व दुसऱ्या खोलीतील वडील बाळू व आई अरुणा झोपले होते.

यावेळी दरोडेखोरांचा आवाज ऐकून प्रदीप यांचा भाऊ आणि भावजय यांनी आरडाओरडा चालू केला. मात्र; खोलीचा दरवाजा बंद असल्याने दरोडेखोरांनी बाहेरुन येऊन दरवाजावर दगड घालण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर दरवाजांच्या कड्या लावून घेत घराबाहेर गोठ्यात झोपलेली आजी शांताबाई दाभाडे हिला घेराव घालून तिला चापटीने मारत अंगावरील दागिने काढून घेतले असल्याचे प्रदीप दाभाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सदरच्या चोरीतील दोन दरोडेखोर हे २५ ते ३० व दोन इसम हे ३० ते ४० वयोगटातील असून त्यांनी काळ्या रंगाची पॅन्ट-शर्ट परिधान केलेले आहे. दोघेजण सडपातळ तर दोघेजण जाड असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. सदर घटनेची शिरूर पोलिसांकडून पाहणी करण्यात आली असून घटनास्थळी सापडलेल्या वस्तूवर चोरट्यांच्या बोटांचे ठसे (फिंगर) तपासणी पथक व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. चार महिन्यांपूर्वी पंचतळे परिसरात जाधव कुटुंबियांची झालेली जबरी चोरी, पंचतळे, जांबूत, पिंपरखेड भागातील फोडलेली दुकाने, मेडिकल, तर टाकळी हाजी, माळवाडी, पिंपरखेड या भागातील शेतकऱ्यांचे कृषिपंप, केबलचोरी, तसेच कृषीयंत्र चोरी, याबरोबरच दुचाकी चोऱ्या तसेच टाकळी हाजी, माळवाडी परिसरातील डाळिंब चोरी, कवठे येमाई येथील व जांबूत येथील कळमजाई मंदिरातील देवीच्या दागिन्यांची चोरी अशा अनेक घटनांचा तपास अद्यापही लागलेला नाही. यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या घटनेत कानातील झुमके, सोन्याची ठुशी, मणी मंगळसूत्र, टॉप्स, नाकातील नथा, चंद्रकोर माळ, कानातील खुटबाळ्या, कानातील वेल या वर्णनाचे दागिने चोरुन नेले. तसेच त्यांच्या घराजवळच असणाऱ्या अंजनाबाई धोंडिभाऊ दाभाडे यांच्या घरावर दरोडेखोरांनी मोर्चा वळवून कपाटातील सोन्याचे वेल आणि रोख रक्कम पाच हजार रुपये असा १७ हजारांचा ऐवज लुटून चोरट्यांनी पलायन केले. चोरीच्या घटनेतील आरोपींवर बेधडकपणे होत नसलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून पिंपरखेड येथील दोन्ही जबरी चोरीच्या घटनेतील चोरट्यांना जेरबंद करण्याचे आवाहन शिरुर पोलिसांसमोर उभे ठाकले असल्याने तपासाला गती देत आरोपींना तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.