सरदवाडीत अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थिनींना PSI शुभांगी कुटे यांच्याकडून मार्गदर्शन

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ, निमगांव म्हाळुंगी या संस्थेच्या अभिनव विद्यालय सरदवाडी येथे रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक आणि निर्भया पथकाच्या प्रमुख शुभागी कुटे यांनी विद्यार्थिनींना “गुड टच आणि बॅड टच'” याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक अरुण गोरडे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस कर्मचारी मोनिका वाघमारे उपस्थित होत्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अर्जुन चव्हाण, अखिल भारतीय मराठा महासंघाचे शिरुर तालुका युवा अध्यक्ष गणेश सरोदे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गणेश निचीत उपस्थित होते.

यावेळी निर्भया पथकाच्या प्रमुख तसेच पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांनी शाळेत येताना व जाताना मुलींनी वाईट प्रवृत्ती पासून आपला बचाव कसा करावा. मुलींनी आपला आत्मविश्वास कसा वाढवावा. याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. निर्भया पथक म्हणजे काय , त्यांचे कार्य काय…? या पथकाचे ध्येय हे मुलींना सक्षम बनविणे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ,समाजामध्ये मुलींची ,महिलांची होणारी छेडछाड थाबविणे मोबाइल फोनद्वारे चॅटिंग करत जे काही गुन्हे घडतात ते करणा-यांवर गुन्हे दाखल करणे हे निर्भया पथकाचे महत्वाचे कार्य आहे याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

पुढे बोलताना कुटे म्हणाल्या की “मुलींनी स्वसंरक्षण करत आत्मविश्वास वाढवावा आपल्या आयुष्यात आई वडीलांचे शिक्षकांचे स्थान, कुटुंबातील वातावरण याची जाणीव ठेवत आचरण असावे . लहान मुलांवर होणारे अत्याचार त्याबाबत पोलीस स्टेशनला दाखल होणाऱ्या गुन्हे यांची उदाहरणांसहित माहिती देऊन आपलं रक्षण आपण स्वतः कस करू शकतो या विषयी त्यांनी माहिती दिली. शाळेला येताना जाताना समूहाने यावे , स्वसंरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण घ्यावे. कोणी जर अन्याय करत असेल , कुणी छेडछाड करत असेल , मोबाईल वर अश्लील बोलत असेल तर अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. घरी असाल तर आई वडिलांना सांगा व शाळेत असालतर शिक्षकांना किंवा पोलिसांची हेल्पलाईन 112 नंबरवर न घाबरता तक्रार करा.तुम्हाला निश्चित पणे मदत मिळेल. यावेळी त्यांनी मुलींशी मोकळेपणाने संवाद साधत , विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच विषयी मोलाचे मार्गदर्शन केले”

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शिरूर तालुका युवा अध्यक्ष गणेश सरोदे म्हणाले ” मुलींनी स्वसंरक्षण करणे आवश्यक आहे त्यासाठी कराटे,ज्यूदो चे प्रशिक्षण घेत आत्मविश्वास निर्माण करत येणाऱ्या संकटावर मात केली पाहिजे”. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण गोरडे यांनी, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम खामकर आणि आभार दादाभाऊ घावटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप सरोदे तसेच हनुमान सरोदे यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले.