ashok-bhorde

पुणे जिल्ह्यातील मंडल अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य केलेल्या बदल्या रद्द करणार…? की अशोक भोरडे यांचा बळी घेणार…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हाधिकारी, पुणे निवासी उपजिल्हाधिकारी व महसूल शाखेचे तहसीलदार यांनी संगनमताने पुणे जिल्ह्यातील काही मंडल अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य व बेकायदेशीर बदल्या केलेल्या आहेत. त्या बेकायदेशीर बदल्या तात्काळ रद्द कराव्यात. याबाबत विविध प्रसार माध्यमातून वृत्त प्रसिद्ध होऊनही पुणे जिल्हाधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बदल्या रद्द केल्या नसल्याच्या निषेधार्थ शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे हे 2 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.

 

सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे मंडल अधिकारी व तलाठी यांच्या चुकीच्या व नियमबाह्य बदल्याबाबत लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर उपविभागीय अधिकारी उपविभाग पुणे यांच्या कार्यालयाने काही तलाठ्यांच्या नियमबाह्य केलेल्या बेकायदेशीर बदल्या तातडीने रद्द कराव्यात. यासाठी भोरडे यांनी शासनाकडे वेळोवेळी लेखी तक्रारही केली होती आणि बेकायदेशीर केलेल्या नियमबाह्य बदल्या रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने विठ्ठलवाडी, टाकळी हाजी, करडे, कोरेगाव भिमा, फाकटे पाच सजा मधील तलाठ्याच्या बदल्या केल्या आहेत.

 

परंतु शासन नियमानुसार या पाच सजातील तलाठ्यांच्या शिरुर तालुक्याच्या बाहेर बदल्या करणे शासन नियमानुसार आवश्यक असताना एकाच तलाठ्याची तालुक्याबाहेर बदली केली असुन उर्वरित चार तलाठ्यांची शिरुर तहसीलदार कार्यालयात बदली केली आहे. हे बेकायदेशीर असुन प्रांत अधिकाऱ्यांनी चुकीच्या बदल्या केलेल्या असुन वरील मागणीसाठी अशोक भोरडे 2 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पुणे जिल्हाधिकारी येथे आत्मदहन करणार आहेत.

 

पुणे जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांचा गैरकारभार भोरडे यांनी उघड केला असुन त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यभरातुन महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टिका होत आहे. तसेच संपूर्ण राज्यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरकारभाराबाबत चर्चाना उधाण आले आहे. पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या बेकायदेशीर बदल्या रद्द करणार की सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांना आत्मदहनास प्रवृत्त करुन त्यांचा सरकारी यंत्रणा बळी घेणार का…? ही सगळीकडे चर्चा सुरु असुन पुणे जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांवरती चौफेर टिकेची झोड उठली आहे.