कान्हूर मेसाई परिसरात जोरदार पावसाची दमदार बरसात

मुख्य बातम्या शिरूर तालुका

पाबळ (सुनिल जिते): गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कान्हूर मेसाई परिसरात रविवारी दुपारनंतर जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहू लागले, तर शेतशिवारात सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र या दमदार पावसामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली असून मका, बाजरी, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांच्या पेरण्यांना वेग येणार आहे. पावसामुळे विहिरी, तलाव आणि ओढ्यांच्या पाणीपातळीतही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. लहान मुलांनी पावसाचा मनमुराद आनंद लुटला, तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.परिसरातील शेतकऱ्यांनी या पावसाचे स्वागत करत, आगामी काळातही अशीच सातत्यपूर्ण पावसाची साथ मिळाल्यास खरीप हंगाम चांगला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत