शिरुर तालुक्यात डॉक्टर दांपत्याच्या भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर डॉक्टर दांपत्याच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीर जखमी झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पवन भगवान साठे या ट्रकचालकावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील खैरे हॉस्पिटलचे संचालक डॉ. मच्छिंद्र खैरे व डॉ. सोनाली खैरे हे दोघे आज १५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या एम एच १२ एच एन ३६५३ या कार मधून पुणे नगर महामार्गावरील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरुन परत येत असताना रस्ता ओलांडण्यासाठी पुणे बाजूकडे येत असताना अहमदनगर बाजूने भरधाव वेगाने आलेल्या एम एच १२ क्यू जि ७४४७ या ट्रकची खैरे यांच्या कारला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला, अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती त्यामध्ये कारचा पुढील निम्मा भाग आतमध्ये गेला.

यावेळी भीषण अपघातात कारच्या डाव्या बाजूला बसलेल्या डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे वय ३७ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

या घटनेबाबत डॉ. कैलास बाळासाहेब बांदल (वय ४५) रा. भैरवनाथ शाळेजवळ पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पवन भगवान साठे (वय २५) रा. किनी ता. जळगाव जि. बुलढाणा याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहेत.

पोलिस बांधवानी व्यक्त केली हळहळ…

शिक्रापुर तसेच रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात ड्युटी बजावणारे अनेक पोलिस बांधव हे शिक्रापुर येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे डॉ सोनाली खैरे आणि मछिंद्र खैरे दांपत्य हे पोलिसांचे फॅमिली डॉक्टर होते. या अपघाताची माहिती कळताच अनेक पोलिसांनी हळहळ व्यक्त केली. या दांपत्याने पोलिसांना कायमच चांगली वैद्यकीय सेवा दिली. त्यामुळे ते आमच्या कुटुंबातील घटकच झाले होते. डॉ सोनाली खैरे यांचा अपघातात मृत्यू झाल्याने आमच्या घरातील सदस्य गेल्याची खंत वाटते अशी भावना पोलिस बांधवानी व्यक्त केली.