शिक्षक बदल्यांतील गैरप्रकार उघड शिरूर तालुक्यात खोट्या वैद्यकीय दाखल्यांवरून सावळा गोंधळ

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यात शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून, पुणे जिल्हा परिषदेकडूनही तालुकाअंतर्गत व तालुकाबाह्य बदल्यांची प्रक्रिया वेगात सुरू आहे. मात्र, शिरूर तालुक्यात या बदल्यांमध्ये गंभीर अनियमितता आणि गैरप्रकार समोर येत असून, खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्या करून घेतल्याचा आरोप काही शिक्षकांवर झाला आहे.

यामुळे संवर्ग ४ मधील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत असून, बदल्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. अनेक शिक्षकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत, लवकरच आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

बदल्यांचे नियमन संवर्गानुसार प्रक्रिया होत असून शिक्षक बदल्यांचे चार संवर्ग शासनाने निश्चित केले असून संवर्ग १ ) ५३ वर्षावरील, गंभीर आजाराने त्रस्त, विधवा, परितक्त्या यांना प्राधान्य. संवर्ग २ ) पती-पत्नी एकत्रिकरण आणि ५३ वर्षावरील शिक्षक.संवर्ग ३)अवघड क्षेत्रात सेवा दिलेल्या शिक्षकांना प्राधान्य.संवर्ग ४ ) उर्वरित सर्व शिक्षक.

शिरूर तालुक्यात अनेक शिक्षकांनी विविध प्रकारचे खोटे वैद्यकीय दाखले सादर करून बदल्या करून घेतल्या आहेत, असे आरोप होत आहेत. यामध्ये कुणी मुलगा, पती, आई-वडिलांना आजारी दाखवले,काहींनी शिक्षक पती/पत्नी आजारी असल्याचे दाखवून सूट घेतली आहे.काही शिक्षक आजारी असल्याचे दाखवून सेवा सुरू ठेवत आहेत, ही बाब संशयास्पद आहे.

या प्रकारामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की, खरोखर आजारी शिक्षक कार्यालयात कामावर हजर असतील तर ते आजारी कसे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.”जे शिक्षक खेड्यात, दुर्गम भागात खऱ्या अर्थाने सेवा देत आहेत, त्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे, काही शिक्षक खोटे दाखले सादर करून मनपसंत ठिकाणी बदली मिळवत आहेत,” असे मत शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याची तयारी काही शिक्षकांनी दर्शवली आहे. चुकीची माहिती सादर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शिक्षक बदल्यांची पारदर्शकता अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून वैद्यकीय दाखल्यांची चौकशी करावी, अशी शिक्षक वर्गाची आग्रही मागणी आहे.