body

जांबुत येथील तरुणाचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू; दुसऱ्यांदा घटना…

मुख्य बातम्या

सविंदणे (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरूर) येथील सचिन बाळू जोरी (वय ३८) या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सदर मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यात झाला असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून समोर आली आहे.

यावेळी घटनास्थळी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सुनिल उगले, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका घुगे आदी उपस्थित होते.

सदर तरूण हा गेले पाच दिवसांपासून बेपत्ता होता.यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. काल गुरूवार (दि.१) रोजी काही तरूणांना सदर तरूणाची कपडे व चपला जांबूत-वडनेर खुर्द रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने शेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात शोधाशोध केली असता फरफट आणि बिबट्याचे पाऊल आढळून आले. यावेळी शोध घेत असताना उसाच्या सरीत स्थानिक तरूणांना एका बाजूला अर्धे खाललेले व कुजलेल्या अवस्थेतील शरीर, डोक्याची कवटी व हात अशा स्वरूपात मृतदेह आढळून आला. यावेळी संबंधित वनविभाग, पोलीस प्रशासन यांना याबाबत माहिती देण्यात आली. तात्काळ संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होऊन पंचनामा करून पुढील तपासणीसाठी मृतदेहाचे नमुने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, संबंधित इसमाचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असून प्राथमिक तपासासाठी मृतदेहाचे नमुने घेण्यात येणार आहे.आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

यावेळी घटनास्थळी भिमाशंकरचे संचालक प्रदिप वळसे पाटील, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामू घोडे, जांबुतचे सरपंच दत्तात्रय जोरी, पोलीस पाटील राहुल जगताप यांचेसह वनविभाग आणि पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरची मनुष्यावर हल्ला करून ठार मारल्याची बिबट्याची ही दुसरी घटना आहे. मागील तीन वर्षांपूर्वी एका लहान बालकावर अशा प्रकारे हल्ला करून ठार करण्यात आले होते. सध्याच्या काळात अन्न पाण्याच्या शोधात बिबट्यांची संख्या वाढत आहे. म्हणून ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी बाहेर न पडता किंवा बाहेर जायचे झाल्यास हातात काठी बाळगावी किंवा जवळ मोबाईल बाळगून त्यावर गाणी वाजवावी व स्वतःची काळजी घ्यावी अशा सुचना केल्या. तसेच रस्त्याच्या कडेने असणाऱ्या झुडूपांची लपण मोठी असून अनावश्यक असलेली झुडूपे काढण्यासाठी भिमाशंकर साखर कारखान्याच्या माध्यमातून जेसीबी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले.तसेच शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात पाणी द्यावे लागत असल्याने अशा प्रकारे भीतीदायक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांसह लवकरच महावितरण विभागाला या बाबतीत भेटणार असल्याचे वळसे यांनी सांगितले आहे.

सदरची घटना ही अतिशय दुर्दैवी असून अशा प्रकारच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी स्वतःची योग्य काळजी घ्यावी. असे अवाहन माजी सरपंच दामू घोडे यांनी केले. तसेच (दि.३१) रोजी जांबुत येथून बेपत्ता असलेल्या वयोवृद्ध महिलेचा देखील तात्काळ शोध घेण्यात यावा अशा सुचना घोडे यांनी दिल्या.

चौकट-बिबटयाच्या वाढत्या संख्येमुळे मानव जातीला धोका, जंगल सोडून बिबटया ऊसाच्या शेतीत वास्तव्य करत आहे. एक मादी अनेक बिबट जन्माला घालत असल्याने झपाट्याने बिबट्याच्या संख्येत होणारी वाढ जास्त असल्यामुळे नागरीकांच्या विशेषतः लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सध्या वाडी वस्तीवर गणेश उत्सव साजरा होत असून रात्रीच्या’ मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळे नागरीक एकत्र येत आहे.परंतू रात्र होताच बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून रात्र होण्याच्या आधी आरती करुन आपआपल्या घरी सुखरूप पोहचण्याचे आवाहन सविंदणे येथील मोहन कीठे, निलेश मिंडे, भिमा लंघे यांनी केले आहे.