leopard

शिरुरच्या बेट भागातील तामखरवाडी येथे बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, सुदैवाने दोघेही बचावले

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागात पाळीव प्राण्यांसह नागरीकांवर बिबट्याचे हल्ले नित्याचेच झाले असताना टाकळी हाजी येथील तामखरवाडी येथील दोन नागरिकांवर हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

 

शेतकरी कुटुंबातील या दोन व्यक्तींवर बिबट्याने शुक्रवारी ( दि १३) ढवळ्या दिवसा हल्ला केला असून यामध्ये अनिता सुरेश पाचंगे नदीवरील विद्युत पंप चालू करून पाणी ओढल्याचे पाहत असताना तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप टाकली. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून जोराने आवाज करत प्रतिकार केल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. ही घटना आज (दि १३) रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. त्यांना उपचारासाठी शिरूर येथे हलविण्यात आले आहे.

 

यानंतर काही तासांतच तेथील शेतकरी कैलास ठकाजी गावडे शेतात शेळ्या चारत असताना बिबट्याने शेळीवर हल्ला केला. गावडे यांनी हे पाहताच त्यांनी बिबट्या हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने गावडे यांच्याकडे मोर्चा वळवला. बिबट्या मागे लागल्यामुळे त्यांनी शेळ्या तेथेच सोडून घराकडे पळ काढला.

 

म्हसे येथे महिलेवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, सोसायटीचे संचालक संतोष गावडे यांनी केली आहे.

 

भय इथले संपत नाही…

शिरुर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून पुर्वी एकटा फिरणाऱ्या बिबट्याचे आता दिवसा सामुहिक दर्शन होत आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यावरील हल्ल्याच्या घटनामुळे पशुधन धोक्यात आले आहे. पूर्वी रात्रीच्या वेळी शेतात बिनधास्त फिरणाऱ्या शेतकऱ्यांना आता बिबट्याच्या भीतीने रात्रीच्या वेळी सोडाच परंतु दिवसा शेतात फेरफटका मारणे मुश्किल झाल्याने शेतकरी पुरते हतबल झाले असून ‘भय इथले संपत नाही ‘ असे चित्र पहायला मिळत आहे.बिबट्याच्या हल्ल्यात आळे येथे एका चिमुकल्याचा मृत्यू तर थोरांदळे येथे जखमी झालेले बाळ या दोन हल्ल्याच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले असून बेट भागात बिबट्या थेट घराच्या दरवाजात येत असल्याने शेतकरी, लहान मुले, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने…सांगा आम्ही जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

 

बेटभागासाठी वरदान ठरलेल्या कुकडी व घोडनदीच्या मुबलक पाण्यामुळे पिंपरखेड, काठापुर ,जांबुत, चांडोह ,फाकटे, वडनेर,टाकळीहाजी ,कवठे येमाई,सविंदणे या बेटभागातील गावात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.या ऊसाच्या लपणचा फायदा उठवत गेले बारा वर्षापासून या परिसरात बिबट्याने शेतकऱ्यांच्या शेळ्यां, मेंढ्या, गाय, वासरू, घोडी , कुत्रा या प्राण्यावर हल्ले करून ठार केले आहे.बिबट्याच्या वारंवार हल्ल्याच्या घटनेने आता अनेक शेतकरी कुत्रा पाळायचे बंद झाले आहेत.बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना नित्याच्या झाल्याने घटना घडूनही वेळेत पंचनामे होत नाही.वनविभागाकडूनही गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्ल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांकडून पाळीव प्राणी पाळण्याच्या संख्येत घट झाली आहे.साहा वर्षापूर्वी एकटा वावरणारा बिबट्या सामुहिकपणेे लोकवस्तीत येण्याचे धाडस करत असल्याने शेतकरी व नागरिक भयभित अवस्थेत बिबट्याच्या दहशतीखाली जीवण जगत आहे.पिंपरखेड येथे बिबटे थेट दारात येत असल्याने कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही.अनेक वेळा जीव मुठीत धरून शेेेेतात पिकांना पाणी देताना ,काम करताना अचानक समोर बिबट्याच्या दर्शनाने काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अनुभव दररोज अनेक शेतकऱ्यांना येत आहे. शेतकरी आणि बिबट संघर्ष कमी करण्यासाठी सरकार कडून तत्काळ उपाययोजनाबाबत शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी आजही वाऱ्यावर आहे.

 

नोव्हेंबरमध्ये ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे.तोडणी सुरू होऊन ऊसाच्या शेताची लपण कमी होऊ लागल्यावर ऊसातील बिबट्या सैरभैर होऊन लपण व भक्ष्य शोधण्यासाठी दिवसाही बाहेर पडत असतो.अनेक वेळा बिबट मादीची पिल्ले ऊसाच्या शेतात तोडणी सुरू असताना आढळतात. त्यावेळी पिलांना वाचवण्यासाठी बिबट मादी पिसळून हल्ला करण्याची शक्यता असल्याने ऊसतोडणीस आडथळा निर्माण होतो.त्याचा परिणाम ऊस तोडणीवर होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

 

जुन्नर वनविभागाकडून सन २०१२च्या दरम्यान या परिसरात बंगलोर येथील सीडब्लूएस या वन्यजीव संशोधन संस्थेच्या माध्यमातून पिंपरखेड आणि काठापुर परिसरात १६ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते.यामध्ये बिबट्या तरस या वन्यप्राण्याची छायाचित्रे कैद झाली होती.त्यानंतर आजपर्यंत येथील बिबट्यांची संख्या आणि हल्ले दिवसेंदिवस वाढतच गेले आहेत.वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याच्या वाढत्या संख्येबाबत अनभिज्ञ असल्याने वनविभागाने या परिसरात नव्याने सर्वेक्षण करून बिबट्याची गणना करणे गरजेचे आहे.बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान ग्रस्तांना वनविभागाडून नुकसान भरपाईची मलमपट्टी ,तसेच बिबट जनजागृती, मोकळे पिंजरे लावणे या पलिकडे बिबटमुक्त परिसर करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

 

 

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड…

बिबट्यापासून पशुधन वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी गायींच्या गोठ्याला लाखो रूपये खर्च करून बांधकाम व तारेचे बंदिस्त कुंपण केले आहे. बिबट्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे.

 

शालेय मुलांची सुरक्षा धोक्यात…

रात्री फिरणारे बिबट कळपाने रस्त्यावर,शाळेच्या आवारात येऊ लागल्याने शालेय मुलांची सुरक्षितता धोक्यात आली असून वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याऐवजी फक्त जनजागृती केली जात आहे.

 

शेतीपंपांना दिवसा वीजेची मागणी…

ग्रामीण भागात शेतीपंपासाठी दिवसा तसेच रात्रीचा वीजपुरवठा असल्याने बिबट्याची भिती असूनही शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत असून शेतीपंपासाठी रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

 

सहजीवन प्रोत्साहन योजनेची गरज…

गेले दहा वर्षांपासून शेतकरी बिबट्याचा संघर्ष सुरु असून बिबट्याच्या दहशतीखाली जगत असलेल्या शेतकऱ्यांचे भविष्य उध्वस्त होण्याअगोदर शासनाने शेतकरी – बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी “सहजीवन प्रोत्साहन योजना” राबवून शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे.

 

अंगणात खेळणेही धोकादायक…

शेतकऱ्यांची घरे शेतात असल्याने घराच्या अंगणाच्या समोर पाठीमागे काही शेजारच्या शेतात असलेल्या ऊसाच्या पिकात बिबट्याचे वास्तव्य असल्याने लहान मुलांना अंगणात पुर्वी सारखे बागडणे अवघड झाले आहे.