पुणे-नगर महामार्गावरील होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संयुक्त बैठक लावा; नाथा शेवाळे

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-अहमदनगर हा राज्यातील महत्त्वाचा महामार्ग असुन या रोडलगतच कोरेगाव भीमा, सणसवाडी ,शिक्रापूर MIDC , रांजणगाव MIDC ,सुपा MIDC या औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहने तसेच लहान वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच पुणे-अहमदनगर महामार्गावर अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि कारखानदार यांनी बेकायदेशीर डिव्हायडर तोडल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच रस्त्यावर बेकायदेशीर वाहतूक पार्किंग तसेच पुणे-नगर महामार्गवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

तसेच रोजच होणाऱ्या या वाहतुक कोंडीमुळे दुचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.तसेच पुणे नगर महामार्ग हा अतिशय महत्त्वाचा असून यावरून मराठवाडा, विदर्भ याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. यासाठी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले . या निवेदनामध्ये पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक लावावी अशी मागणी केली. तर जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाविषयी आपण लवकरात लवकर बैठक लावू असे आश्वासन नाथा शेवाळे यांना दिले.