शिरुर तालुक्यात वाळू डेपोच्या नावाखाली सर्रास वाळूचोरी; रात्रीच्या वेळेस चोरट्या मार्गाने होतेय वाळूची वाहतुक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणातून वाळू उपसा करण्यासाठी शासनाच्या वतीने निमोणे आणि चिंचणी येथे वाळूडेपो उभारण्यात आले. शासनाच्या वतीने 600 रुपयात 1 ब्रास वाळू देण्यात येणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात मात्र या वाळूडेपोवर सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळतच नसुन चिंचणी येथील वाळूडेपोच्या नावाखाली रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररीत्या वाळूची चोरटी वाहतुक सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे “आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय” असं म्हणण्याची वेळ सर्वसामान्य लोकांवर आली आहे.

 

शिरुर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासुन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे वेगवेगळे कारनामे समोर येत असल्याने महसूल विभाग पुरता बदनाम झाला आहे. शिरुरला यापुर्वी तहसीलदार म्हणुन काम करणाऱ्या दोन महिला अधिकारी तसेच काही कर्मचारी वेगवेगळ्या प्रकरणात दोषी सापडल्याने आधीच महसूल विभागाची अब्रू चव्हाट्यावर आलेली आहे. काही वर्षांपुर्वी तळेगाव ढमढेरे येथील गोडाऊन मधुन कारवाई केलेल्या वाळूच्या गाड्याचं प्रकरण असो किंवा तहसीलदार कार्यालयात बोकडाचा नैवेद्य दाखविन्याचा प्रकार असो शिरुर तहसीलदार कार्यालय सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

 

शासनाने सर्वसामान्य लोकांना 600 रुपयात 1 ब्रास वाळू मिळेल असा गाजावाजा करत घोडनदीच्या पात्रातून वाळू काढण्यासाठी रीतसर निमोणे आणि चिंचणी येथे वाळू डेपो उभारले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खरंच स्वस्तात वाळू मिळेल अशी आशा वाटू लागली. परंतु या वाळू डेपोवर स्वस्तात वाळू मिळणे तर दूरच पण सर्वसामान्य लोकांना वाळू मिळविण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागत आहे.

 

चिंचणी येथील वाळूडेपो वर याबाबत चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही शिरुर येथील तहसीलदार कार्यालयात जाऊन सेतू कार्यालयात ऑनलाईन रजिस्टर करा आणि रीतसर पावती घेऊन या मग आम्ही तुम्हाला वाळू देतो असे सांगण्यात येते. शिरुर येथे सेतू कार्यालयात गेल्यावर आमच्याकडे ऑनलाईन रजिस्टर करण्याची सुविधा नाही. तुम्हीच तुमच्या मोबाईलवरुन ऑनलाईन रजिस्टर करा असे उत्तर मिळते. मोबाईलवर वाळूसाठी रजिस्टर कसे करावे याबाबत सर्वसामान्य लोकांना काहीच माहिती नसते. आणि चुकून ऑनलाईन रजिस्टर करायचा प्रयत्न केला. तर त्यात सर्व्हर डाउन तसेच अनेक तांत्रिक अडचणी असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळणे तर दूरच पण नाहक मनस्ताप होत आहे.

 

रात्रीच्या वेळेस चोरट्या मार्गाने होतेय वाळूची वाहतुक…

चिंचणी येथे गेल्या दोन ते तीन महिन्यापासुन रात्रीच्या वेळेस वाळूच्या डेपोत वाळू न आणता थेट चोरुन वाहतूक केली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी तक्रार केली असुन रात्रीच्या वेळेस घोड धरणात वाळू उपसा केला जातो. परंतु ती वाळू डेपोवर न आणता परस्पर विकली जाते असा आरोप येथील स्थानिक लोकांनी केला आहे. महसूल विभागाचे कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाहीत ना अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन याबाबत शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना संपर्क साधला असता असा काही गैरप्रकार चालु असल्यास आम्ही चौकशी करु असे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

(क्रमश:)