शिरूर (सुनिल जिते): ग्राहकांचा बँकेवरील विश्वास आणि सुरक्षित गुंतवणुकीला मिळणारा प्रतिसाद यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जांबुत शाखेने बॉण्ड वितरणात विक्रमी कामगिरी केली आहे. नुकतेच शाखेच्या वतीने विशाल जुन्नर पतपेढीला दोन कोटी रुपयांचे बॉण्ड्स वितरित करण्यात आले.
जांबुत शाखेने आतापर्यंत विविध संस्था व खातेदारांना एकूण ७ कोटी ९३ लाख १० हजार रुपयांचे बॉण्ड्स वितरित केले आहेत. यामध्ये जांबुत ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला पाच कोटी रुपये, विशाल जुन्नर पतपेढीला दोन कोटी रुपये, शरदचंद्र नगरी सहकारी पतसंस्थेला ५० लाख रुपये, अंबिका ग्रामीण पतसंस्थेला २५ लाख रुपये, व्यक्तिगत खातेदारांना २० लाख रुपये, तर इतरांना १८ लाख १० हजार रुपयांचे बॉण्ड्स वितरित करण्यात आले आहेत.
शाखाप्रमुख भरत तंबारे म्हणाले, “ग्राहकांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दाखविलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. सुरक्षित गुंतवणुकीसोबत ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. बॉण्ड वितरणाचा हा विक्रमी टप्पा संपूर्ण शाखा टीमच्या मेहनतीचे आणि ग्राहकांच्या विश्वासाचे फलित आहे. यापुढेही ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरेल, अशाच पद्धतीने काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
शाखेच्या कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम, उत्कृष्ट टीमवर्क आणि ग्राहकांचा बँकेवरील दृढ विश्वास यामुळे ही विक्रमी कामगिरी शक्य झाली आहे. ग्राहकांना यापुढेही दर्जेदार व विश्वासार्ह सेवा देण्यासाठी जांबुत शाखा कटिबद्ध असल्याचे तंबारे यांनी सांगितले.