ठाणे: ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसारच घरांची किंमत निश्चित करण्याचे आदेश त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पात एकूण १,१७३ घरे उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी ९३८ घरांची सोडत १४ जुलै २०२५ रोजी काढण्यात आली होती. मात्र, घरांना २०२५-२६ च्या रेडी रेकनर दरानुसार किंमत आकारण्यात आल्याने काही सदनिकांच्या किमती ५१ ते ५२ लाख रुपयांपर्यंत गेल्या होत्या.
या गृहप्रकल्पाला २०२०-२१ मध्ये अंशतः भोगवटा प्रमाणपत्र मिळाले होते. त्यावेळी सदनिकांची किंमत सुमारे ४४ लाख रुपये, म्हणजेच १० हजार रुपये प्रति चौरस फूट दराने निश्चित करण्यात आली होती. मात्र, पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र २०२५-२६ मध्ये मिळाल्यानंतर उर्वरित घरांच्या किमती वाढल्या.
एकाच इमारतीत समान क्षेत्रफळाच्या सदनिकांसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याने नागरिकांनी दरामध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी केली होती. याबाबत आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व घरांसाठी २०२०-२१ चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरून किंमत निश्चित करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, यापूर्वीच्या सोडतीतील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांनी स्वीकृतीपत्रे जमा केली आहेत. त्यांना कायम ठेवण्यात येणार असून उर्वरित घरांसाठी नव्या दरानुसार पुन्हा सोडत काढण्यात येणार आहे.त्यामुळे चितळसर-मानपाडा गृहप्रकल्पातील घरे आता सुमारे ४४ ते ४६ लाख रुपयांच्या दरात नागरिकांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.