महसुल सेविका वृषाली घुलेचा राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत गौरव

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यस्तरीय महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच नांदेड येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये खोखो आणि रनिंग (धावणे) या खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथिल महसुल सेविका वृषाली संतोष घुलेला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

वृषाली घुले हिने खेळात दाखवलेला झंझावाती खेळ, समर्पण, आणि संघभावना यामुळे तिची कामगिरी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. खोखो सारख्या पारंपरिक खेळात तिने अप्रतिम चपळाई, युक्ती आणि ताकद यांचे दर्शन घडवले. तसेच रनिंग प्रकारात देखील तिच्या वेगवान पावलांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत ती यशाच्या शिखरावर पोहोचली.

ही क्रीडा स्पर्धा महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांतील सहभागी स्पर्धकांमध्ये वृषालीची कामगिरी लक्षणीय ठरली असून तिच्या या यशामुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.या गौरवाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वृषालीच्या खेळातील योगदानाची प्रशंसा करताना सांगितले की, “महसूल विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असलेली ऊर्जा आणि क्रीडा कौशल्य हे या स्पर्धांमधून प्रकर्षाने दिसून येते. वृषाली घुले हिची कामगिरी हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.”

वृषालीने मिळवलेल्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही विशेष अभिनंदन केले आणि भविष्यात अधिक मोठ्या स्तरावर तिचे प्रतिनिधित्व होवो, अशी शुभेच्छा दिली.या स्पर्धेद्वारे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये एकतेची भावना वाढवण्यास मदत झाली असून खेळामुळे येणारा उत्साह आणि आरोग्यदायी दृष्टिकोन अधिक बळकट झाला आहे. वृषालीसारख्या खेळाडूंमुळे तरुण कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्थान निर्माण झाले आहे.