संजय गांधी अनुदान योजनेतील वयोवृद्ध लाभार्थ्यांची होतेय ससेहोलपट

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): संजय गांधी अनुदान योजनेतील वयोवृद्ध, विधवा ,परीतक्त्या लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला जमा करण्याच्या जाचक नियमामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची ससेहोलपट होत असल्याने ज्येष्ठांबरोबरच महिलांमधुन मोठया प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असुन संजय गांधी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या देयक यादी मधील लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रे जमा करण्याबाबत व तसा नविन नियम झाला असल्याचे तहसिल कार्यालयाकडून सांगण्यात आले असल्याचे यावेळी लाभार्थ्यांनी सांगितले.

शासनाच्या अनुदान योजनेतील लाभार्थी हे वयस्क, दिव्यांग तसेच महिला असुन त्यातील काही लाभार्थी निरक्षर आहेत. थरथरणारे हात पाय, वय झाल्याने काठीचा आधार घेत दिसण्यास कमी यांसह अनेक अडचणींचा सामना करत तालुक्यातुन कसे बसे हे लाभार्थी शिरुरच्या तहसिल कार्यालयात येत असतात. येथील सेतू आणि तलाठी कार्यालयात उत्पनाचा दाखला मिळण्यासाठी सादर करावे लागणारी कागदपत्रे या लाभार्थ्यांना एजंटांकडुन किंवा इतरांकडून विनंती करुन भरुन घ्यावे लागत आहेत.

यातील अनेक लाभार्थी हे ज्येष्ठ असून उत्पन्नाचा दाखला हा प्रकरण मंजुर करतेवेळी जमा केलेला आहे. या वयात कोणतेच काम करता येत नसल्याने उत्पन्नाचा प्रश्नच येत नाही. परंतु उत्पन्न दाखला पुन्हा जमा करण्याच्या जाचक नियमांमुळे सेतु, तहसिल कार्यालय ते अहवालासाठी तलाठी कार्यालय आणि परत सेतुत अहवालासह सदर कागदपत्रे जमा केल्यानंतर मिळलेला उत्पन्न दाखला बॅंकेत जमा करायचा असा प्रवास करताना लाभार्थी अक्षरशः मेटाकुटीला येत असून त्यांची विनाकारण ससेहोलपट होत असल्याचा संताप व्यक्त करत असून वयाचा विचार करुन तरी यातुन मार्ग काढुन एकाच ठिकाणी उत्पन्न दाखला मिळण्यासाठी प्रयत्न केल्यास होणारी धावपळ व ससेहोलपट थांबण्यास मदत होईल अशी मागणी लाभार्थ्यांकडुन करण्यात येत आहे.

संजय गांधी अनुदान योजनेतील अनेक लाभार्थी वयस्कर असल्याने एकाच ठिकाणी उत्पन्न दाखला त्यांना द्यावेत अशी मागणी मनसेच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे,मनसे रस्ते साधन सूविधा तालुकाध्यक्ष सुदाम चव्हाण, शहराध्यक्ष संजोग चव्हाण उपस्थित होते.वयस्कर लाभार्थ्यांची उत्पन्न दाखला मिळवताना होणारी हेळसांड लवकर थांबली नाही तर मनसे स्टाईलने तहसिल कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी बोलताना दिला.

संजय गांधी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला मिळवताना होणाऱ्या अडचणी व त्रासाबाबत तहसिलदार यांच्याशी चर्चा केली असून अनेक गावातील सेतू चालक या दाखल्यासाठी नागरीकांची आर्थिक लुट करत आहे. त्यामुळे योग्य मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे असे मत अध्यक्ष संजय गांधी निराधार अनुदान योजना ॲड. सुदीप गुंदेचा यांनी सांगितले.