Shirur Police Station

शिरुर पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई; 4 आरोपींना अटक

क्राईम

शिरुर (तेजस फडके): राजस्थान राज्यातून अहमदनगर मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या गुटख्यावर सापळा रचुन शिरुर पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटखा वाहतुक करणाऱ्या प्रवासी लक्झरी बसससह 4 जणांना ताब्यात घेतले असून ६ लाख ३० हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्ट रोजी प्रवासी वाहतुक करणाऱ्या लक्झरी बस मधुन राजस्थान मधून आलेला गुटखा अहमदनगर मार्गे पुण्यात नेण्यात येणार असल्याची बातमी खबऱ्या मार्फत शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने हालचाल करत त्या लक्झरी बसवर तात्काळ कारवाई करणेबाबत त्यांनी पोलीस पथकास पाचारण करत पुणे-नगर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्हीजन इंटरनॅशनल, इंग्लिश स्कुल येथे सापळा रचुन अहमदनगर कडुन पुण्याला जाणारी ही लक्झरी बस हाताचा इशारा करुन थांबविली.

त्यानंतर बस चालक, सहचालक तसेच क्लिनर यांना खाली उतरवत बसची डिक्की उघडून तपासणी केली असता डिक्कीमध्ये एका पांढऱ्या रंगाचे गोणीत वेगवेगळया पाऊचमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला आणि मानवी जिवीतास धोकादायक असलेला गुटखा मिळून आला त्यामुळे पोलिसांनी सदरचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यामध्ये ३० हजार २५० रुपये किमतीचा विमल पान मसाला गुटखा व व्ही १ कंपनीची सुगंधीत तंबाखु असा माल आणि गुटखा वाहतुक करणाऱ्या लक्झरी ट्रॅव्हल्स बस नं (एन एल 01 बी 2093) ची किंमत 6 लाख असा एकुण 6 लाख 30 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये १) सोहमलाल बौध्दराम गुर्जर (वय ४०) रा. त्रिलोकपुरा, सिकर, राजस्थान २ ) देवाराम भागुराम गुर्जर (वय ४२) ३) सुभाषचंद बन्सीधर गुर्जर (वय २८) रा. दतला, सिकर, राजस्थान ४ ) दिनेशकुमार मंगलारामजी मेघवाल (वय २१) रा. दौलतपुरा, जि.नागोर राजस्थान यांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपींना आज (दि 4) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना (दि. 6) ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घटट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस नाईक नितीन सुद्रिक, बाळासाहेब भवर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पालवे, राजाराम गायकवाड यांनी केली असुन या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे हे करत आहेत.

यापुढे अशाच प्रकारे प्रवासी वाहतुक करणारे ट्रॅव्हल्स किंवा इतर वाहनांचा वापर करून गुटखा वाहतुक करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असुन नागरिकांनी गुटखा वाहतुक, विक्री, किंवा साठवणुक करु नये असे आवाहन शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले आहे.