जलजीवन योजनेच्या पाईपलाईनच्या कामामुळे त्या रस्त्याची ठेकेदाराने लावली वाट

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे -कान्हूर मेसाई या रस्त्यालगत जलजीवन अभियान योजनेच्या पाईपलाईनचे काम चालू आहे. परंतू या पाईपलाईनच्या खोदाईमुळे मुख्यमंत्री सडक योजनेतून झालेल्या डांबरी रस्त्यावर पोकलेन चालवून या रस्त्याची वाट लावण्याचे काम सदर मुजोर ठेकेदाराकडून होत आहे.

पोलकेन रस्त्यावर चालवल्यामुळे बऱ्याच ठिकाणी डांबरी रस्ता ऊखडला आहे, तसेच रस्त्यालगतच खोदकाम सुरू असल्याने साईडपट्टयांची वाट लागली आहे. रस्त्यावर माती व दगड आले असून टू- व्हीलर , फोर व्हीलर वाहनचालकांना वाहन चालवताना मोठा त्रास होत असून छोटे -मोठे अपघात या रस्त्यावर होत आहे.

सविंदणे ते कान्हूर हा रस्ता पुण्याला जाण्यासाठी जवळचा मार्ग असून बऱ्याच दिवसानंतर या रस्त्याचे काम झाले होते. परंतू या पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्याची संपुर्णपणे वाट लागली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन पाहणी करून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी या परीसरातील नागरीकांनी केली आहे.

घटनास्थळी भेट देवून रस्त्यालगतचे चुकीचे काम तात्काळ थांबवले असून नागरीकांना विश्वासात घेऊन चांगले काम केले जाईल.

दत्तात्रय पवार – उपकार्यकारी अभियंता, पुणे

बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर हा रस्ता डांबरी झाला होता. रस्त्यापासून अंतर न सोडता रस्त्याला खेटूनच जलजीवन योजनेच्या पाईपलाईनचे काम सूरू असून या रस्त्यावर पोकलेन चालवल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे पंचनामा होऊन ठेकेदावर कारवाई होणे आवश्यक आहे.

शुंभागी पडवळ -सरपंच सविंदणे