बेपत्ता बालिकेला शोधण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची रात्रभर धडपड

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा सोळुंके हि सात वर्षाची बालिका सायंकाळच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली मात्र त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी रात्रभर सदर बालिकेचा शोध घेतला असून अद्यापही सदर बालिकेचा शोध लागलेला नाही.

शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथील अपेक्षा सोळुंके (वय ७) हि तिच्या वडिलांसोबत खाऊ आणायला गेली. खाऊ घेतल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला घराच्या समोर सोडले मात्र त्यांनतर ती घरीच परतली नाही. त्यामुळे प्रथम शेजारी असलेल्या नवरात्र उत्सवात असेल असे वाटले. मात्र तिचा तपास काही लागेना याबाबतची माहिती मिळताच शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, महिला पोलीस निरीक्षक माधुरी झेंडगे यांच्यासह तीस ते पस्तीस पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर बालिकेचा शोध सुरु केला.

तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने देखील सदर ठिकाणी येत बालिकेचा शोध घेण्यास सुरवात केली, रात्रभर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्र, नागरिक यांनी बालिकेचा शोध घेतला मात्र सकाळ पर्यंत देखील त्या बालिकेचा काहीही शोध लागला नाही, याबाबत बालिकेची आई राधिका युवराज सोळुंके रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे हिने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.