शिरुर-हवेली विधानसभा समन्वय पदाची माऊली कटके यांच्यावर जबाबदारी

मुख्य बातम्या राजकीय

मुंबईत ‘शिवसेना उद्धव गटा’च्या विशेष बैठकीत सर्वानुमते निवड

शिरुर (अरुणकुमार मोटे) लोकसभा तसेच विधानसभा सन 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. दोन्ही निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी संघटनात्मक बांधणी आणि नवी रचना करीत शवसेना ठाकरे गटाचे विभागीय नेते जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. तर शिरुर-हवेली विधानसभा निवडणूक समन्वय पदाची जबाबदारी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

 

मुुंबई येथे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची विशेष बैठक झाली. खासदार संजय राऊत यांच्यावर उत्तर महाराष्ट्रासह पुणे, नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिडीं, बारामती, शिरुर, मावळ (विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यानुसार खासदार राऊत तसेच माजी राज्यमंत्री तथा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी शिरुर-हवेली विधानसभा समन्वयक पदासाठी माऊली कटके यांचे नाव सुचविले उपस्थितांनी यावर एकमताने सहमती दर्शविली.

 

लोकसभा तसेच विधानसभा 2024 चे लक्ष गाठण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गटाची नवी रचना जाहीर करताना महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देत विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. पुणे जिल्हा प्रमुख माऊली कटके हे खासदार संजय राऊत तसेच सचिन आहेर यांच्या जवळचे आणि विश्‍वासू सहकारी मानले जातात. यामुळेच उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी स्विकारत असताना संजय राऊत यांनी शिरुर-हवेली विधानसभा समन्वयक पदाची जबाबदारी माऊली कटके यांच्यावर सोपविली आहे.

 

शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माऊली कटके यांनी मोठे काम केले आहे. तळागळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. तसेच, शिवसेनेचे भक्कम नेतृत्त्व म्हणून मदारसंघात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 2024 मध्ये होणार्‍या विधानसभेसाठी शिवसेनेकडून शिरुर-हवेलीमधून माऊली कटके यांचे नावही उमेदवारीसाठी घेतले जाते. त्यातच त्यांच्यावर या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे आगामी 2024 मध्ये शिवसेना लोकसभा तसेच विधानसभा विजयाचे लक्ष गाठणार अशीच चर्चा माऊली कटके यांच्या निवडीनंतर सगळीकडे रंगली आहे.

 

जानेवारीत ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर…

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीची तयारी तसेच महाराष्ट्रासह दिल्लीत बदल घडविण्याची तयारी म्हणून जानेवारीत ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय जाहीर सभा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा झंझावती दौराही होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍याची आणि सभांबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.

 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत साहेब यांनी दाखविलेला विश्‍वास आजपर्यंत सार्थ ठरविला आहे. शिरुर-हवेली विधानसभा समन्वयक पदाची जबाबदारी तेवढ्या सक्षमपणे पेलणार आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा विशास आहे अशी प्रतिक्रिया माऊली कटके यांनी व्यक्त केली.

शिरुर तालुक्यातील वाळू लिलावाच्या धोरणामध्ये बदल करण्याची शिवसेनेची मागणी