शिरुर; चारचाकी गाड्यांना अनधिकृत पाट्या तसेच अवैध दारुविक्रीबाबत मातंग नवनिर्माण सेना आक्रमक…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यात तसेच शिरुर तालुक्यातील अनेकजण महाराष्ट्र शासन, आमदार, पोलिस, प्रेस तसेच विविध शासकीय पाट्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागात किंवा पाठीमागे लावतात. तसेच पोलिस खात्यात असणाऱ्या नातेवाईकांच्या ओळखीचा गैरफायदा घेत पोलिस अधिकाऱ्यांच्या टोप्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागात ठेऊन अनेकवेळा सर्वसामान्य लोकांवर दबाव टाकत अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच शिरुर तालुक्यातील अनेक हॉटेल व ढाब्यामध्ये सर्रास बेकायदेशीर दारुविक्री केली जात असल्यामुळे मातंग नवनिर्माण सेनेने याबाबत आक्रमक भुमिका घेतली आहे.

 

मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक तसेच शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) आणि शिक्रापुर, रांजणगाव MIDC व शिरुर पोलिस स्टेशन या तीनही पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आले असुन पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यात चालणारा हा सगळा गैरप्रकार थांबवावा अशी मागणी महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे सदस्य तसेच मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हस्कु शेंडगे तसेच राज्य सचिव लक्ष्मण मांढरे, जिल्हाध्यक्ष अविनाश शेलार व पुणे शहरध्यक्ष सागर लोणारी यांनी केली आहे.

 

अल्पवयीन मुलांचे पालक सुधारणार कधी…?

सध्या पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाची सगळीकडे जोरदार चर्चा असताना शिरुर तालुक्यातही अनेक पालक बिनधास्तपणे अल्पवयीन मुलांच्या हातात चारचाकी वाहने देत आहेत. परंतु याकडे संबंधित विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरणी सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झालेल्या असताना ग्रामीण भागात मात्र अजुनही अल्पवयीन मुले तसेच पालकांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळेच शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील अशा घटना घडू शकतात. त्यावर वेळीच अंकुश लावणे गरजेचे आहे.

 

शिरुर तालुक्यात सगळीकडे अवैध व्यवसाय जोमात…?

तसेच शिरुर तालुक्यातील अनेक हॉटेल आणि ढाबे येथे अवैध दारुविक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांना सर्रासपणे दारु दिली जाते. त्यामुळे हिच अल्पवयीन मुले शाळा,काॅलेजच्या परिसरामधे उपद्रव माजवत असतात. उस वाहतूक करणारे बहुतांश ड्रायव्हर देखील दारुच्या नशेमधे ऊस वाहतुक करत असतात. यावर संबंधित विभागाने कारवाई करावी. तसेच अनेक ठीकाणची हाॅटेल, बियर बार, ढाबे हे विनापरवाना रात्रभर चालु असतात. तसेच तिथे दारुविक्री बरोबर इतर प्रकारचे अवैध व्यवसाय सुद्धा चालू असतात.

 

पुणे जिल्ह्यात मातंग नवनिर्माण सेना आक्रमक…

पुणे जिल्ह्यासह ग्रामीण भागात पोलीस प्रशासन, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि त्यासंबंधित विभाग मात्र अवैध धंद्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत असल्याचे पहायला मिळत आहे. म्हणूनच भविष्यात पुण्यातील घटनेप्रमाणे अशा प्रकारचे अजून निष्पाप बळी जाऊ नयेत यासाठी अवैध व्यवसायिकांवर कारवाई व्हावी. तसेच युवापिढी चुकीच्या मार्गाने जाऊ नये. यासाठी वेळीच संबंधित विभागाने कार्यवाही करावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा मातंग नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हस्कु शेंडगे तसेच राज्य सचिव लक्ष्मण मांढरे यांनी दिला आहे.

शिरुरच्या बेट भागात वाढत्या रोहीत्र, केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर पोलीस,महावितरणची संयुक्त बैठक

शिरुर; रांजणगाव येथील अथर्व ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला

शिक्रापुर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त