शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

मुख्य बातम्या शिरूर तालुका

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मोठे यश संपादन करत मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती मिळवली आहे. तिच्या या यशामुळे अरणगाव परिसराततुन सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

निकिता मखर हि आर्थिक अडचणींना सामोरी जात असतानाही शिक्षण आणि करिअरच्या वाटचालीत खंबीरपणे उभी राहिली. निकिता हिची घरची परिस्थिती हलाखीची असुन लहानपणीच तिच्या वडीलांचे निधन झालेले आहे. तिची आई शेती करुन स्वतःचा उदरनिर्वाह करते. तिला एक लहान भाऊ असुन त्याच शिक्षण चालू आहे. त्यामुळे तिने आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून दिवस-रात्र मेहनत घेतली. पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिने बारामती येथील शारदानगरमधील शारदा महिला मोफत पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले.

या प्रशिक्षण केंद्रातील मार्गदर्शक शिक्षक तनपुरे सर, खारतोडे सर, कर्णे सर आणि देवकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली निकिताने शारीरिक व लेखी परीक्षेची काटेकोर तयारी केली. प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आणि स्वतःच्या अथक परिश्रमामुळे तिने सर्व टप्पे यशस्वीरित्या पार केले. निकिताच्या या यशामुळे तिच्या कुटुंबियांचा संघर्ष फळाला आला असुन गावकऱ्यांनीही तिच्या कर्तृत्वाचे मनापासुन स्वागत केले आहे. “गरीबी ही अडथळा नसून जिद्दीने कोणतेही स्वप्न साकार करता येते,” हे निकिताने आपल्या यशातून दाखवून दिले आहे.

तिच्या या यशामुळे परिसरातील अनेक मुलींना प्रेरणा मिळत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती आदर्श ठरत आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस दलात तिची झालेली नियुक्ती ही केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर संपुर्ण अरणगावसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत