शिरुर पोलीस स्टेशनला तत्पर सेवेमुळे २०२३ चा विशेष गौरव पुरस्कार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना कमी वेळेमध्ये जलदगतीने तप्तर सेवा दिल्याने पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते शिरुरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना नुकताच विशेष गौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले.

 

ऑक्टोबर २०२३ मध्ये नागरिकांच्या मदतीकरिता उपलब्ध असलेल्या डायल ११२ या हेल्पलाईन नंबर वर पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सर्वात कमी रिस्पॉन्स टाईम मध्ये तक्रारदाराच्या मदतीकरिता पोहोचून त्यांना आवश्यक ती मदत केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या वतीने पोलिस निरीक्षक संजय जगताप आणि शिरुर पोलिस स्टेशन यांना ऑक्टोंबर २०२३ या महिन्याचा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 

सदरचा पुरस्कार मिळण्यामध्ये शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस अंमलदार वीरेंद्र भानुदास सुंबे, शिवाजी गणपत भोते, विशाल कचरु पालवे, भाऊसाहेब शहाजी टेंगले यांचे मोलाचे योगदान आहे. या पुरस्काराने शिरुर पोलीस व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची मान अभिमानाने उंचावली असून यापुढे अधिक उत्स्फूर्तपणे काम करण्याची त्यांना प्रेरणा मिळणार आहे. या पुरस्कारामुळे शिरुर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीतील नागरीकांना महीलांना काही तात्काळ गंभीर अडचणी किंवा एखादा वाईट प्रसंग आल्यास तात्काळ ११२ नंबर डायल करुन या सेवेचा लाभ घ्यावा. कमीत कमी वेळेत आम्ही आपणापर्यंत पोहचून तात्काळ तक्रारीचे निराकरण करु.

संजय जगताप

(पोलिस निरीक्षक, शिरुर)