लाचखोरपणामुळे शिरुरच्या महसुलची अब्रु चव्हाट्यावर, पैसे दिल्याशिवाय नागरीकांची कामेच होत नाहीत…

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील महसुल विभागाच्या तत्कालीन तहसीलदार, तलाठी, महसुल सहाय्यक व दोन खाजगी इसमांना तब्बल ४२ लाखांची लाच मागताना लाललुचपत विभागाने गुन्हा दाखल केल्याने पुणे जिल्हयासह महाराष्ट्रभर या मोठया लाचेच्या प्रकरणाची चर्चा चांगलीच गाजली. एवढया मोठया ४२ लाखाच्या रकमेच्या लाचेची ही पुणे जिल्हयातील बहुदा पहीलीच कारवाई असावी. महसुल विभागासह इतर विभागात नागरीकांची, शेतकऱ्यांची विविध कामे पैसे घेतल्याशिवाय होत नसल्याचे या घटनेमुळे अधोरेखीत होत आहे.

गेल्या दोन वर्षापासून नागरीक तहसिल कार्यालयात वारंवार हेलपाटे मारत असून प्रभारी तहसिलदारांमुळे अनेक कामे प्रलंबित आहे. तत्कालीन प्रभारी तहसिलदार व आलेला प्रभारी तहसिलदार यांनी गौण खनिजाच्या एकाही केसवर, फाईलवर सुनावणी घेऊनही अद्यापपर्यंत निकाल, आदेश दिले नाहीत. आपण थोडया दिवसाच्या कालखंडात ही प्रकरणे हाताळून कशाला उगाच त्रास करुण घ्यायचा?ही भावना त्या पाठीमागे असावी. त्या पाठीमागे कारणही तसेच आहे तत्कालीन तहसिलदार लैला शेख यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार करुन अनेक वादग्रस्त निकाल दिले आहेत.

त्यामुळे अनेक नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी अर्ज तसेच मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्या आहे. त्यांची चौकशी होऊन तडकाफडकी बदली झाल्यामुळे अदयापपर्यंत रेग्युलर तहसिलदारांची नियुक्ती शिरुर कार्यालयात झालेली नाही. मा. महसुल मंत्री यांनी तात्काळ लक्ष देवून नवीन तहसिलदारांची नियुक्ती करुन शिरुरच्या महसुलची सगळी लक्तरे वेशीला टांगण्याआधी अब्रु वाचवण्याचे काम करावे.

सापडला तर तो चोर नाहीतर शिरजोर या ऊक्तीप्रमाणे जो लाललुचपतच्या सापळ्यात सापडेल तोच भ्रष्ट्राचारी असे नाही. असे अनेक तलाठी, मंडल आधिकारी, ऑफिसमधील कर्मचारी आहेत ते नागरीकांना विविध नोंदीसाठी कामांसाठी मोठया प्रमाणात दिवसाढवळ्या लुबाडत आहेत. त्यांच्यावर तक्रार करुनही अदयापपर्यंत कारवाई झालेली नाही. वरीष्ठांकडून नेहमीच पाठराखण होत असल्यामुळे नागरीक आता थेट लाल लुचपत विभागाकडे तक्रार करत आहेत.

टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय कुठल्याच विभागात फाईल काही पुढे हालत नसल्याचे चित्र दिसत आहे. या वर्षभरात शिरुर पोलिस स्टेशन, भुमी अभिलेख, वन विभाग, तहसिल कार्यालय यामध्ये या वर्षात लाल लुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केल्याने स्पष्ठ होत आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांना पैसे कमावून देण्यासाठी व स्वतःसाठी जास्त पैसे कमावण्याच्या नादात अनेक कर्मचारी लाललुचपत विभागाचे बळी ठरत आहे.