शिरुर शहरातील रोड रोमियोंवर पोलीस निरीक्षक संजय जगताप यांची कडक कारवाई

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याचा चार्ज घेताच नवनियुक्त पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी शिरुर शहरात महत्वाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसह पायी फिरुन रुट मार्च करत पेट्रोलिंग केले. त्यानंतर बेट भागातील टाकळी हाजी तसेच कवठे येमाई येथे धडाकेबाज कारवाई करत लाखों रुपयांचा अवैध गावठी हातभट्टीचा दारुसाठा ताब्यात घेऊन नष्ट केला. त्यानंतर त्यांनी शिरुर शहरातील रोडरोमियोंकडे आपला मोर्चा वळवला असुन शहरातील सी टी बोरा कॉलेज रस्त्यावर पोलिस निरीक्षक जगताप यांनी स्वतः अनेक वाहनांवर वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई केली.

सोमवार (दि 17) रोजी सकाळी 8:30 ते 11:00 च्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय जगताप हे स्वतः सि.टी.बोरा कॉलेज रस्त्यावर थांबले होते. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, सहायक फौजदार अनिल चव्हाण, गणेश देशमाने, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, संतोष साळुंखे, शेखर झाडबुके, अर्जुन भालसिंग, प्रवीण पिठले, नितेश थोरात, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जाधव या सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत पोलिस निरीक्षक जगताप यांनी अनेक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली.

यावेळी विनाकारण या रस्त्यावर फिरणारे रोड रोमियो, ट्रिपल शिट, विना परवाना गाडी चालविणे, विना नंबर प्लेट तसेच चारचाकी वाहनांना ब्लॅक फिल्ममिंग अशा अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच लहान मुले गाडी चालवीत असताना कारवाई दरम्यान सापडल्याने त्यांच्या पालकाना बोलाऊन एक वेळ समज देऊन सोडण्यात आले आहे. यावेळी वाहतूक नियमनाचे उल्लंघन करणाऱ्या 75 व्यक्तीवर कारवाई करुन सुमारे 83 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे सर्व नागरिक आणि पालक या सर्वांनी रस्त्यावर वाहतूक नियमांचे पालन करावे आणि 18 वर्षांपेक्षा लहान पाल्यानां कोणतेही वाहन चालवण्यास देऊ नये असे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे.