शिरुर (तेजस फडके): कारेश्वर बी.सी. मंडळाच्या नावाखाली भिशी चालवून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत तब्बल ३९ गुंतवणूकदारांकडून २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार कारेगाव (शिरुर) येथे समोर आला आहे. भिशी बंद पडल्याचे सांगून गुंतवणूकदारांनी वारंवार मागणी करुनही रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुलभा शरद नवले, नितीन शरद नवले, सुहास शरद नवले, अश्विनी नितीन नवले आणि प्रतिक्षा सुहास नवले, सर्व (रा. कारेगाव, ता. शिरुर, जि.पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. बारकू चंदर सोनवणे (वय ५४, व्यवसाय शिक्षक, रा. चंदननगर, पुणे; मूळ रा. वाघाळे, ता. शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे तर याचा तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत.
दिलेल्या फिर्यादीनुसार, सुलभा नवले यांनी ‘कारेश्वर बी.सी. मंडळ’ ही नोंदणीकृत भिशी असल्याचे भासवून गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले. लिलाव भिशीमध्ये पैसे गुंतवल्यास एका वर्षात मूळ रकमेच्या दामदुप्पट रक्कम मिळेल, असे सांगण्यात आले. भिशी चालविण्याचा १७ वर्षांचा अनुभव असून दरमहा सुमारे १९ भिशी आणि तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल असल्याचे सांगून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप आहे.
सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी विविध भिशींमध्ये स्वतःच्या व कुटुंबीयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतविली. ऑनलाइन व रोख व्यवहार मिळून एकूण ७५ लाख ४० हजार रुपये कारेश्वर भिशीत गुंतविल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यापैकी ऑनलाइन व्यवहारातून ४२ लाख ६० हजार रुपये, तर रोख स्वरूपात ३२ लाख ८० हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
विशेष म्हणजे, भिशीत पैसे भरण्यासाठी सुलभा नवले यांनी सांगितलेल्या विविध व्यक्तींच्या बँक खात्यांवरही रक्कम वळती करण्यात आली. सोनवणे यांच्या पत्नीच्या खात्यातून मोनेष युवराज धुमाळ, मनोहर काका वारे, दीपक सुभाष नवले आणि नितीन शरद नवले यांच्या खात्यांवर विविध तारखांना एकूण २४ लाख रुपये पाठविण्यात आले. तसेच मुलगी अपूर्वा बारकू सोनवणे हिच्या खात्यातून कुलदीप तात्या बांदल यांच्या खात्यावर पाच लाख रुपये वळते केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
इतकेच नव्हे तर सुलभा नवले व नितीन नवले यांच्याकडे १० लाख रुपये रोख दिल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. रोख रक्कम स्वीकारताना आरोपींकडून घरातील नोटा मोजण्याच्या मशीनद्वारे पैसे मोजले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या कथित भिशीच्या व्यवहारात दीपक नवले याचाही सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भिशीतील सभासदांची नावे, जमा रक्कम आणि भिशी उचलणाऱ्यांची माहिती स्पायरल बाइंडिंगमध्ये लिहिण्याचे काम तो करीत असल्याचा आरोप आहे.
नाव नोंदणी कुठे…? व्यवहार मात्र कोट्यवधींचा
सर्वात गंभीर बाब म्हणजे, ‘कारेश्वर बी.सी. मंडळ’ हे कोणत्याही सरकारी कार्यालयात, बँकेत किंवा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत नसतानाही नोंदणीकृत असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे भिशी चालविण्यात आली, असा थेट आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सन २०२० ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३९ जणांकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात तब्बल २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये जमा करण्यात आल्याचा दावा आहे.
भिशी बंद पडली अन् गुंतवणूकदारांची धावपळ…
नोव्हेंबर २०२४ पासून भिशी बंद पडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, मागणी करूनही पैसे परत मिळाले नसल्याचा आरोप आहे. दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने विश्वास संपादन करून कोट्यवधी रुपये जमा केले आणि त्यानंतर रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्याने या प्रकरणाने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
३९ गुंतवणूकदार, २० कोटींच्यावर व्यवहार आणि पाच जणांवर गुन्हा यामुळे या प्रकरणाचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. आरोपींनी जमा केलेल्या रकमेचा नेमका वापर कुठे केला, कोणाच्या खात्यावर किती रक्कम वळती करण्यात आली आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.