शिरुर तालुक्यातील ‘हा’ रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

मुख्य बातम्या

रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे, दुभाजकांची दुरवस्था

शिक्रापूर: शिक्रापूर चाकण हा राज्य महामार्गातील महत्वाचा महामार्ग क्रमांक ५५ चा रस्ता असून सदर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून कित्येक ठिकाणी दुभाजक जमीनदोस्त झाले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने वाहने उभी राहत असल्याने अपघातांची संख्या वाढली असून सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथून चाकण मार्गे मुंबई, नाशिकला जाणारा महत्वाचा रस्ता म्हणजे शिक्रापूर चाकण हा महामार्ग क्रमांक ५५ मधील रस्ता असून येथील रस्त्याचे काही वर्षांपूर्वी काम झालेले होते. त्यानंतर पुन्हा येथील रस्त्यावर कोणत्याही पद्धतीचे काम झालेले नाही. सध्या येथील रस्त्यावर अनेक ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. सध्या रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी अवजड वाहने धोकादायक पद्धतीने उभी केली जात आहेत. सदर रस्त्याचे कडेला असलेल्या काही हॉटेल चालकांनी रात्रीच्या वेळेसाठी पार्किंग सुरु केल. मात्र तेथे सर्व माती असल्याने वाहनांच्या चाकाने माती रस्त्यावर येऊन वाहने घसरुन देखील अपघात होत आहेत.

तसेच सदर रस्त्यावर साबळेवाडी येथे वळणदार घाट रस्ता असून येथील वळणावरच मोठमोठे खड्डे बनून खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनचालकांना कसरत करण्याची वेळ येत आहे. सदर रस्त्यावर कित्येकदा वाहने उलटून एका घरावर देखील वाहन उलटल्याची घटना घडलेली असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. विशेष म्हणजे सदर रस्ता मुंबई कडे जाणारा असल्याने अनेक आमदार, खासदार व मंत्री यांसह मोठमोठे अधिकारी देखील शिक्रापूर चाकण रस्त्याचा वापर करत असतात परंतु रस्त्याची अवस्था पाहूनही सर्वजन गप्पच असल्याचे दिसून येते.

सदर रस्त्यावर अनेकदा मोठमोठे अपघात होऊन कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याची दुरवस्था झालेली असताना या रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी झाडे वाळली असून झाडे रस्त्यावर पडून अनेकदा वाहतूक कोंडी देखील होत असल्याचे चित्र दिसून येत असते. सदर रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांना काही खुणा नसल्याने वेगाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा अंदाज चुकूनही रात्रीच्या सुमारास अपघात झालेले असल्यामुळे येथील रस्त्याबाबत वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाहनांवर कारवाई करणे गरजेचे: अशोक भुजबळ (जिल्हाध्यक्ष)
शिक्रापूर चाकण रस्त्याचे कडेला उभी राहणाऱ्या कंटेनर, ट्रक या वाहनांना काही लावलेले नसते, लाईट नसते त्यामुळे काही अपघात झालेले आहे. मात्र अशा घटना वारंवार होऊ नये म्हणून अशा उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ यांनी सांगितले.

दुभाजक व खड्ड्यांमुळे अपघात: कचरु वाजे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष)
शिक्रापूर चाकण रस्त्यावरील चौफुला येथे असलेले गतिरोधक व दुचाजक नाहीसे होत चालले आहेत, तेथे सिग्नल नाही त्यामुळे रात्रीच्या वेळेला वाहन चालकांना खड्डे व दुभाजकाच अंदाज येत नसल्यामुळे अपघात होत असल्याचे वाजेवाडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष कचरु वाजे यांनी सांगितले.

प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी: राहुल साबळे (सामाजिक कार्यकर्ते)
शिक्रापूर चाकण रस्त्यावर साबळेवाडी येथे अनेक वर्षांपासून खड्डे पडलेले आहेत. गावातील स्थानिक नागरिक सामाजिकदृष्ट्या खड्डे बुजवत असतात मात्र ते खड्डे पुन्हा होतात. याकडे प्रशासनाने काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे साबळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल साबळे यांनी सांगितले.

शिक्रापूर चाकण रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना
१) रस्त्यावर होणारे खड्डे वेळोवेळी बुजवणे.
२) रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.
३) रस्त्याच्या कडेला पार्किंग व्यवसाय करुन रस्त्यावर चिखल पसरविणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करणे.
४) रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभी असलेली जीर्ण झाडे काढून टाकणे.
५) रस्त्याचे कडेला जागोजागी दिशा व धोका दर्शक फलक लावणे.
६) रस्त्याच्या कडेला धोकादायक उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.