शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत परवाना नसतानाही बेकायदेशीररीत्या चालवले जातात बार 

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन, चोऱ्या आणि दरोड्याचे सत्र सुरुच असुन त्याचबरोबर अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कसलाही परवाना नसताना बेकायदेशीर परमिटरुम आणि बार चालु असल्यामुळे टाकळी हाजी पोलिसांनी नुकतीच त्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात विनापरवाना बार कसे आणि कोणाच्या आशिर्वादामुळे चालवले जातात हा मुद्द पुढे आला आहे.

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्ग, शिरुर-चौफुला महामार्ग, अष्टविनायक महामार्ग तसेच अनेक महत्वाचे महामार्ग जातात. या महामार्गालगतच अनेक महत्वाची गावे असुन तेथे परमिटरुम आणि बार आहेत. पण त्यापैकी किती अधिकृत आणि किती अनधिकृत बार आहेत. याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करणे गरजेचे असुन परवाना नसलेल्या परमिटरुम आणि बार वर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच हे विनापरवाना बार कोणाच्या आशीर्वादाने चालतात हाही मोठा यक्षप्रश्न आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष…?

सूत्रांच्या माहितीनुसार आठ दिवसांपुर्वी बेट भागातील टाकळी हाजी येथील एका अनधिकृत परमिटरुम व बार वर टाकळी हाजी औट पोस्टच्या पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर या बारवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी पोहचले. परंतु “वराती मागून घोड” या म्हणीप्रमाणे तोपर्यंत हा बार बंद करण्यात आला होता. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करताच माघारी जाण्याची नामुष्की ओढवल्याची सगळ्या गावात दबक्या आवाजात चर्चा आहे.

कारवाईची माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ…?

शिरुर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी औट पोस्टच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी टाकळी हाजी गावातील “त्या” अनधिकृत परमिटरुम व बार वर आठ दिवसांपुर्वी कारवाई केली आहे. परंतु या कारवाईची माहिती घेण्यासाठी “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या प्रतिनिधीने वारंवार संपर्क साधला असता संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच या कारवाईत काही कर्मचाऱ्यांचे मोठया प्रमाणात “ओटी भरण” करण्यात आले असल्यामुळे पोलिस संबंधित कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचीही गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. याबाबत शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.