शिरुर तालुक्यातील त्या गावातील कचरा प्रश्न गंभीर

मुख्य बातम्या

ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांच्या भावनेचा होतोय छळ

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) हे गाव शिरुर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे गाव असून गावामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य मोहीम न राबवता त्यास चुकीचे वळण दिले जात असल्याचा प्रकार समोर येत असून ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांच्या भावनेचा छळ होत असल्याचे दिसून येत आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न गंभीर होत असताना ग्रामपंचायतच्या वतीने कचऱ्याच्या ठिकाणी काही फलक लावण्यात आले. मात्र त्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे, कचरा टाकणाऱ्याच्या घरावर म्हसोबा कोप करेल असे वाक्य लिहिण्यात आले असताना मात्र कोठेही कॅमेरे बसविले नसल्याचे देखील समोर आले आहे, अशा प्रकारे चुकीची पद्धत व ग्रामस्थांची मने दुखावली जातील अशी गैरवर्तने ग्रामपंचायत नागरिकांसोबत करत आहे.

इतकेच नव्हे तर ग्रामपंचायतच्या वतीने कचऱ्याच्या ठिकाणी म्हसोबा देवाचा फोटो लावल्याने अनेक भक्तांची मने दुखावत आहे तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे, देवतांचे फोटो पवित्र अशा ठिकाणी लावायला हवे ते कचऱ्याच्या ठिकाणी लावले गेले असल्याने ग्रामपंचायत ग्रामस्थांसह भाविकांच्या भावनेचा छळ करत असल्याचा आरोप होत आहे.

गावातील पंढरीनाथ नगर येथील रस्त्यांच्या बाजूने प्लास्टिक कचरा फेकला जात असल्याने काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचले असून रात्रीच्या वेळी कचरा पेटविला जात असल्याने मोठे वायुप्रदूषण होत आहे. खोटे बोर्ड लावून नागरिकांच्या भावनेशी खेळण्यापेक्षा कारवाई का केली जात नाही असा प्रश्न सर्व नागरिकांसह ग्रामस्थांना पडला आहे.