तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

महाराष्ट्र

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात चप्पल घेऊन मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या 47 वर्षीय रमाबाई रणवीर यांच्या जिद्दीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अंबाजोगाई येथील मॅरेथॉनमध्ये त्यांनी दाखवलेल्या या असामान्य धैर्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, देशभरातून त्यांच्या संघर्षाला सलाम केला जात आहे.

रमाबाईंच्या या संघर्षाची दखल घेत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. त्यांच्या मातृत्वाची आणि मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाची देशपातळीवर दखल घेतली गेल्याने रमाबाईंच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.

मदतीचा ओघ सुरू

रमाबाईंच्या संघर्षाची दखल सर्वप्रथम स्थानिक प्रशासनाने घेतली. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी 50 हजार रुपये, तर बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब ए. सय्यद (न्यायाधीश) यांनीही तातडीची मदत देत रमाबाईंना आधार दिला.यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रमाबाईंच्या धैर्याचे कौतुक करत एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही रमाबाईंना धावण्यासाठी विशेष शूज भेट देत त्यांच्या जिद्दीचा सन्मान केला.

मुलींच्या शिक्षणासाठी मिळणार मोठा आधार

रमाबाईंच्या परिस्थितीची संवेदनशील दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी त्यांच्या दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पोथरा या मूळ गावी रमाबाईंना ‘रमाई आवास योजने’अंतर्गत पक्के घर बांधून देण्यात येणार आहे. आवादा फाउंडेशनकडून 51 हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरील शैक्षणिक आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे.

मुलींच्या स्वप्नांसाठी आईची धडपड सुरूच

रमाबाईंची लहान मुलगी आरती नांदेड येथे बी.एस्सी. (कॉम्प्युटर)चे शिक्षण घेत आहे. तर मोठी मुलगी पूजा ज्ञानदीप अकॅडमी, अंबाजोगाई येथे पोलीस भरतीची तयारी करत आहे.

मुलींच्या भविष्यासाठी रमाबाई स्वतः त्याच अकॅडमीत स्वयंपाकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. स्वतःच्या कष्टातून मुलींना शिकवण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे.

आजवर विविध संस्था, प्रशासन आणि मान्यवरांकडून पाच लाख रुपयांहून अधिक मदत मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र मुलींचे पुढील शिक्षण, भविष्यातील खर्च आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता रमाबाईंचा संघर्ष अद्याप संपलेला नाही.

स्वतःच्या आयुष्याची धाव थांबवून मुलींच्या स्वप्नांना वेग देणाऱ्या रमाबाई रणवीर यांची ही जिद्द आता केवळ एका मॅरेथॉनपुरती राहिलेली नाही; ती संघर्षातून उभ्या राहणाऱ्या मातृत्वाची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत