पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच पारदर्शक बदल्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची क्रांतिकारी कारवाई

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्ह्यात महसूल प्रशासनात ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आलं असून, पहिल्यांदाच तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या पारदर्शक बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या बदल्यांमध्ये एक रुपयाही लाच किंवा राजकीय दबाव न घेताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. त्यामुळे प्रशासनात प्रामाणिकपणाला चालना मिळाली असून, संपूर्ण जिल्ह्यात या निर्णयाचे कौतुक होत आहे.

बदल्यांची प्रक्रिया पूर्णतः संगणकीकृत आणि निकोप पद्धतीने करण्यात आल्या आहेत.या बदल्यांमध्ये कोणत्याही मध्यस्थाची भूमिका नव्हती. स्थानिक राजकीय हस्तक्षेप, नातेसंबंध, वशिल्याची संस्कृती याला पूर्णविराम देत, बदल्यांची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन प्रणाली आणि सेवा ज्येष्ठता, कार्यकाळ, उपलब्ध पदे व अर्ज केलेल्या प्राधान्यानुसार पार पाडण्यात आली.

अनेक वर्षांनंतर “प्रशासनात प्रामाणिकतेची लाट”

पदाधिकाऱ्यांनी गुप्तपणे किंवा दबावाखाली बदल्यांसाठी खाल्ल्या जाणाऱ्या लाचखोरीच्या गोष्टी आता भूतकाळात जमा होतील, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपली कार्यपद्धती स्पष्ट करताना सांगितलं, “बदलती पदसोपान म्हणजे कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी ‘स्थिरता’ नव्हे, तर कार्यक्षमतेनं काम करण्याची संधी असते.”

या बदल्यांमुळे, जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला नवा आत्मविश्वास मिळाला आहे. “डुडी पद्धत” अशी नवी उपमा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वसामान्य कर्मचारी वर्ग, शेतकरी संघटना, आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या निर्णयाचं प्रशंसापूर्वक स्वागत केलं आहे.

हा निर्णय केवळ पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवा आदर्श ठरणार आहे. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि सक्षम बदल्यांची प्रणाली इतर जिल्ह्यांनीही स्वीकारावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.