तळेगाव ढमढेरेत प्रशासन सुट्टीवर तर पुढारी बांधकामावर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गावातील धनदांडग्या व्यक्तींसह राजकीय लोकांनी अतिक्रम करुन व्यावसायी गाळ्यांचे बांधकाम सुरु केले याबाबत अनेक तक्रारी होत सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याबाबतचे लेखी आदेश दिलेले असताना देखील सदर व्यक्तींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रशासन सुट्टीवर असताना अतिक्रमण न काढता रात्रदिवस काम सुरु ठेवून बांधकाम पूर्ण करुन घेतले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे न्हावरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर रस्त्याचे कडेला गावातील काही राजकीय व्यक्ती व पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण करत व्यवसायी गाळ्यांचे काम सुरु केले, येथे अतिक्रम झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊन अपघाते वाढणार असल्याने काही नागरिकांनी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.

दरम्यान ग्रामपंचायत व तहसीलदार कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर ठिकाणच्या अतिक्रमण धारकांना नोटीस देत सदर ठिकाणचे अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले. मात्र दिवाळीच्या सुट्ट्यामुळे सर्व शासकीय कार्यालय बंद असल्याने गावातील अतिक्रमण धारकांनी सदर ठिकाणचे अतिक्रमण काढून न घेता शासकीय अधिकारी सुट्टीवर असल्याचा फायदा घेत चक्क सर्व बांधकामच पूर्ण करुन टाकल्याचा प्रकार घडला. या ठिकाणी अतिक्रमण करुन गाळे बांधणाऱ्या व्यक्तींमध्ये राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून सदर व्यक्तींना शासनाचा धाक आहे कि नाही असा सवाल आता उपस्थित होत असून प्रशासन यावर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तळेगाव ढमढेरे मध्ये यापूर्वी खूप अतिक्रमण झाले आहे, चिमणा पिरमाळा कडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नवीन कोणत्या कंपन्या आमच्या गावात येत नाही. सध्याच्या अतिक्रमण बाबत तक्रार करणाऱ्यांना यापूर्वीच्या अतिक्रमण दिसले नाही का असा सवाल शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता मयूर सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता सदर ठिकाणी आमच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठवून पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता मयूर सोनवणे यांनी सांगितले.