शिरुरच्या बाजारपेठेत अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम सुरु; नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत सिटी सर्वे नुसार 10 × 12 फूट एवढ्याच जागेची नोंद असताना वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत अनधिकृतपणे बांधकाम चालु असुन 8/ अ वर नोंद असलेल्या जागेपेक्षा जास्त जागेत अतिक्रमण करत हे काम चालू असल्याचा आरोप सुरेश सदाशिव खांडरे यांनी केला असुन शिरुर नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिरुर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुभाष चौक येथील बाजारपेठेत राजरोसपणे अनधिकृत बांधकाम चालू करण्यात आलेले असुन सदरील व्यक्तीने इमारतीची दुरुस्ती करायची अशा आशयाचा अर्ज शिरुर नगरपरिषदला दिला होता. परंतु त्यांनतर पाया खोदून RCC मध्ये पक्के बांधकाम चालू केले होते. परंतु याबाबत सुरेश खांडरे यांनी नगरपरिषदकडे लेखी निवेदन आणि तोंडी तक्रार करुन लक्षात आणून दिली. त्यानंतर नगरपरिषदने सदर बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला रीतसर नोटीस काढून कामाविषयी विचारणा केली आणि बांधकाम चालु असलेल्या जागेची पाहणी करत सदरील बांधकाम बेकायदेशीर असल्याने बांधकाम करणाऱ्या जागा मालकास स्वखर्चाने पाडण्यास सांगितले आणि बांधकाम न पाडल्यास फौजदारी गुन्हा दाखल करुन दंड वसूल करण्यात येईल अशी नोटीस पाठवली होती.

ही नोटीस शिरुर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद बोरकर यांनी दि 10 ऑक्टोबर 2022 रोजी बजावली होती. ही नोटीस बजावल्यानंतर त्या बांधकाम करणाऱ्या जागा मालकाने सिटीसर्वेच्या नोंदीपेक्षा जास्तीचे वाढीव काम न पाडता पुन्हा त्याच जास्तीच्या वाढीव RCC बांधकामावर पुन्हा युद्ध पातळीवर काम चालू केले आहे. याची माहिती विचारण्यासाठी सुरेश खांडरे नगरपरिषदेमध्ये गेले असता सदरील बांधकाम अधिकारी कांचन यांनी 10 फूट × 12 फूट च्याच जागेमध्ये परवानगी दिली आहे. असे तोंडी सांगितले. तसेच सदरील व्यक्तीने बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज केला असल्याचे या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

परंतु वाढीव अनधिकृत बांधकाम काम चालू असुन मुख्याधिकारी यांनी अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नोटीस दिली होती. परंतु त्यांच्या नोटिसला न जुमानता पुन्हा त्याच बांधकामावर RCC पक्के काम चालू केले आहे. तसेच नगर परिषदेने बांधकामास परवानगी दिली असेल तर वाढीव अनधिकृत कामावरती हे काम चालू कसे आहे. तसेच त्या अनधिकृत बांधकामाची नोंद कशा प्रकारे केली असा प्रश्न शिरुर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच सदरील बांधकाम कोणाच्या राजकीय आशीर्वादाने चालू आहे. यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी तसेच कारवाई न झाल्यास सुरेश सदाशिव खांडरे यांनी संविधानिक मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांना विचारले असता त्यांनी संबंधित व्यक्तीस आम्ही नोटीस बजावली असल्याचे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.