टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने ९ गावातील ग्रामस्थ करणार उपोषण 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्यामुळे उपचाराअभावी या भागातील अपघातात, गरोदर स्त्रीया, नवजात बालके यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या बेट भागातील तब्बल नऊ गावांच्या ग्रामपंचायतींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार रोहित पवार, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी थेट आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे धाव घेतली. तसेच, माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी ही सहा महिन्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे पत्र दिले होते.

मात्र, अद्यापपर्यत चौकशी कमिटी चौकशी करून गेल्यानंतरही अद्यापपर्यत कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे ( दि. ६ ऑक्टोबर )रोजी टाकळी हाजी येथिल आरोग्य उपकेंद्रापुढे ९ गावातील नागरीक उपोषणास बसणार आहे. त्याबाबतचे लेखी पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे व इतरांना लेखी निवेदनाद्वारे दिलेले आहे.

चौकशी समितीत त्यांचेच वरीष्ठ अधिकारी असल्याने वस्तुस्थिती दर्शक अहवाल त्यांनी सादर केला नसल्याची तक्रारही जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचे वडील उच्च पदस्थ अधिकारी असल्याने त्यांच्या दबावाखाली ही यंत्रणा चुकीचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे चौकशी समितीतील अधिकाऱ्यांचे फोन कॉल्स, व्हाट्सअप यांचे सीडीआर काढून चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली न झाल्यास मोठे जन आंदोलन उभारणार असल्याचे नितीन उर्फे शंकर पिंगळे यांनी सांगितले आहे

आठ दिवसात वैद्यकीय अधिकाऱ्यांवर “ग्रामस्थांकडून मिळालेली सर्व माहिती व जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पाहणी या अनुषंगाने चौकशी समितीमार्फत सविस्तर अहवाल कारवाईसाठी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल

डॉ. रामचंद्र हंकारे 

जिल्हा आरोग्य अधिकारी,पुणे