रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांनी निवडणुकीत दारु आणि ड्रॅगचा मोठया प्रमाणात वापर केल्याचा विरोधकांवर गंभीर आरोप केला. या वक्तव्यांमुळे संपुर्ण तालुक्याच्या तरुणाईवर संशयाची सावली पडली असून, संतप्त युवकांनी सोशल मिडीयावर सर्वपक्षीय नेत्यांना थेट आणि धारधार शब्दांत जाब विचारला आहे.
“आम्ही स्पर्धा परीक्षा देतो, कारखान्यांत नोकरी करतो, शेतात आई-वडिलांना हातभार लावतो. आमची लग्नं व्हायची आहेत, करिअर घडवायचं आहे. मुठभर लोकांच्या कथित कृत्यांमुळे संपूर्ण तालुक्याची बदनामी का…?” असा थेट सवाल सुशिक्षित व निर्व्यसनी तरुणांनी उपस्थित केला आहे.
आरोपांची धुरळेबाजी, पण पुरावे कुठे…?
रांजणगाव जिल्हा परिषद गटातील निवडणुकीनंतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी युवकांचा गैरवापर झाल्याचे गंभीर आरोप केले. त्यावर इतर पक्षांकडून “ठोस पुरावे द्या; सर्वपक्षीय पातळीवर कारवाईसाठी आम्ही तयार आहोत,” अशी भूमिका मांडली गेली.
मात्र, आतापर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार, ठोस पुरावा किंवा प्रशासनाकडून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे राजकीय व्यासपीठांवरून केले जाणारे आरोप हे केवळ मतभेदांचे शस्त्र तर नाहीत ना, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
राजकारण करा, पण तरुणांच्या भविष्याशी खेळू नका…
या विषयावर सामाजिक माध्यमांवर आणि स्थानिक बैठकींमध्ये युवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. “चुकीचे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. पण संपुर्ण तालुक्याच्या युवकांवर संशयाची छाया टाकणे अन्यायकारक आहे,” असे मत अनेकांनी नोंदवले.
शिरुर तालुका हा औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणारा भाग म्हणून ओळखला जातो. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत परिसरात देश-विदेशातील उद्योग उभे राहत आहेत. बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ येथे येत आहे. अशा पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील ठरतो.
परंतु केवळ राजकीय वादातून संपुर्ण तालुक्याच्या युवकांना ‘संशयित’ ठरवण्याचा प्रयत्न झाला, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. नोकरी, शिक्षण, विवाह अशा सामाजिक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची छाया पडू शकते, अशी भीती पालक वर्गाने व्यक्त केली आहे.
या विषयावर काही नागरिकांची या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी आणि काही चुकीचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच निष्पाप तरुणांना बदनामीपासून वाचवावे. प्रशासनाने वस्तुस्थिती जाहीर करुन संभ्रम दुर करावा अशीही मागणी केली आहे.
शिरुरची ओळख डागाळू देऊ नका…?
शिरूर तालुक्याची ओळख उद्योग, शेती, परिश्रम आणि संस्कारांनी आहे. काही मुठभर व्यक्तींच्या कथित कृत्यांमुळे संपूर्ण समाजावर संशयाची छाया पडणे हे अन्यायकारक असल्याचे तरुणांचे स्पष्ट मत आहे. “राजकारण करा, पण आमच्या भविष्याशी खेळू नका. दोषींवर कारवाई करा; पण शिरूरची प्रतिमा मलिन करु नका अशी तरुणांची मागणी आहे.
त्यामुळे आता सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागल्या आहेत. सत्य काय, अफवा काय — याचा उलगडा होणे आवश्यक आहे. अन्यथा आरोपांच्या धुरळ्यात तालुक्याची प्रतिमा आणि तरुणाईचे भविष्य दोन्हीही धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.