शिरुर तालुक्यात अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पंचनामे कधी…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कान्हूर मेसाई (सुनील जिते) वादळी वाऱ्यासह पावसाने शिरूर विभागात कान्हूर मेसाई येथील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करताना काहींचे पंचनामे झालेले आहेत तर काहींचे अजुनही पंचनामे झालेले नाहीत. अवकाळी पाऊस होऊन सुमारे दिवस उलटून गेले तरीही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे प्रशासन नुकसानग्रस्तांची दखल घेणार का…? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे आहे.

 

शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आठ दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यात कान्हूर मेसाई ,मिडगुलवाडी, कवठे येमाई , शास्ताबाद या गावांना पावसाचा तडाखा बसला. ठिकठिकाणी घरांचे पत्रे उडाले. झाडे उन्मळून पडली. वीज खांब कोलमडले. शेती पिकांचे मोठे नुकसान केले. हा परिसर शिरुर महसूल अंतर्गत येत असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. नुकसानग्रस्तांचे पंचनामे मात्र कार्यालयातच बसून केले आहे. तर काही ठिकाणी नुकसान होऊनही पंचनाम्याकडे दुर्लक्ष झाल्याचेही येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

 

राज्य सरकार शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मदत नेमकी कुठे थांबली आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या विषयावर कुठलाही अधिकारी बोलण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणाकडे दाद मागावी…? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

 

कान्हूर तसेच परिसरातील गावात अवकाळी पावसामुळे तसेच गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असुन झालेली नुकसान भरपाई शासनाने लवकरात द्यावी. तसेच काही शेतकऱ्यांचे पंचंनामे झालेले नाहीत त्यांचेही लवकरात लवकरात पंचनामे करण्यात यावेत.

बबन शिंदे (जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉग्रेस)