शिक्रापुरच्या पदाधिकाऱ्यांचे चाललय तरी काय ?

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख ) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने खळबळ उडाली. मात्र शिक्रापूर ग्रामपंचायत मध्ये देखील अनेकदा ग्रामसभेत गोंधळ होत असताना आता सोसायटीच्या सभेत देखील गोंधळ होत असल्याने शिक्रापूरच्या पदाधिकाऱ्यांचे चालले तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिक्रापुर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती, यावेळी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय मांढरे, व्हाईस चेअरमन जालिंदर केवटे, सचिव काळूराम भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, सोसायटीचे संचालक निलेश थोरात, गौरव करंजे, दत्तात्रय राऊत, शिवाजी जकाते, संदीप गायकवाड, सुनील भूमकर, अनिल राऊत, चंद्रकला भुजबळ, विमल वाबळे, मधुकर भुजबळ, भाऊसाहेब केवटे, अरुण सोंडे, सिकंदर शेख, हरिभाऊ खेडकर, बाळासाहेब भुजबळ, प्रकाश सोंडे, विजय खेडकर, संपत चव्हाण, हनुमंत दरवडे यांसह आदी पदाधिकारी व सोसायटीचे सभासद उपस्थित होते.

यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर अचानक सोसायटीमध्ये अनेक वर्षापासून काम पाहणाऱ्या माया निंबाळकर यांना अचानक कमी करत कामाचा काही अनुभव नसलेल्या नवीन व्यक्तीची नियुक्ती केली. तसेच सोसायटी सभासद होण्यासाठी आलेल्या अटीत केलेल्या बदलाच्या मुद्द्यावरून सदर सभेत प्रचंड गोंधळ उडाला यावेळी चक्क हाणामारीवर आलेला गोंधळ काही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने आटोक्यात आला. परंतु शिक्रापूर सारख्या गावात यापूर्वी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत देखील अनेकदा मोठ्या प्रमाणात गोंधळ होत वादिवाद देखील झालेले असताना आता सोसायटीच्या सभेत देखील गोंधळ होत असल्याने शिक्रापूरच्या पदाधिकाऱ्यांचे चालले तरी काय असा सवाल सर्व नागरिकांना पडला आहे.

शिक्रापूर सोसायटीच्या सभेत सभासदांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरुन काही गोंधळ झाला मात्र सदर मुद्द्यांवर नंतर सोसायटी पदाधिकाऱ्यांची चर्चा झालेली नाही तसेच सध्या सोसायटीची मिटिंग प्रक्रिया सुरु असल्याचे सचिव काळूराम भुजबळ यांनी सांगितले.