पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे गावात पैशाच्या वादातून पिस्तूल रोखून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक संपत नवले (वय २३) रा. करडे, ता. शिरूर याने महेश रोडे रा. करडे ता. शिरूर याच्यावर प्लॉटींग व्यवहारातील पैशाच्या वादातून पिस्तूल उगारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना (दि. १२) एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली होती.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, व संजू जाधव यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे करडे येथे सापळा रचून दीपक नवले याला ताब्यात घेतले.
अटक करताना आरोपीकडे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस सापडले. पोलिसांच्या तपासादरम्यान दीपक नवले याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी या कारवाईतून गावात वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.