डांग्या खोकला लक्षणे व उपाय

आरोग्य

डांग्या खोकला हा श्वसन संस्थेचा एक गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे. डांग्या खोकला या आजाराला Whooping cough किंवा पेरट्युसिस (pertussis) असेही म्हणतात. डांग्या खोकला हा बोर्डेटेला पर्ट्युसिस नावाच्या जीवाणूमुळे (बॅक्टेरियामुळे) होतो. या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे तीव्र आणि अनियंत्रित खोकला येतो त्यामुळे रुग्णाला श्वास घेताना अधिक त्रास होऊ लागतो.

डांग्या खोकला हा आजार कोणत्याही वयाच्या लोकांना त्रासदायक असाच असतो. परंतु त्यातही नवजात बालक आणि लहान मुलांसाठी डांग्या खोकला आजार अत्यंत घातक ठरु शकतो.

डांग्या खोकल्याची लक्षणे

डांग्या खोकल्यात सुरवातीला सर्दी होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे, खोकला येणे आणि ताप येणे अशी लक्षणे असतात. दोन आठवड्यांनंतर कोरडा व सतत खोकला येत असतो. ज्यामुळे श्वास घेणे खूप अवघड होते. खोकल्यातून घट्ट बेडके येत असतात. उलटी होऊ शकते. सततच्या खोकल्यामुळे श्वास घेताना “हूप” असा विशिष्ट आवाज येत असतो. म्हणून या आजाराला बोलीभाषेत माकड खोकला या नावानेही ओळखले जाते. डांग्या खोकल्यात बरेच दिवस खोकल्याची उबळ येत असते.

डांग्या खोकल्याचे निदान व तपासणी

डांग्या खोकल्याचे लक्षणांवरून निदान होण्यास मदत होते. याशिवाय छातीचा एक्स-रे, खोकल्यातील बेडक्याची किंवा घशातील स्रावांची तपासणी आणि रक्त तपासणी करून याचे निदान केले जाते.

डांग्या खोकल्यावर असे करतात उपचार

डांग्या खोकला हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा सांसर्गिक रोग आहे. त्यामुळे डांग्या खोकल्याची लक्षणे जाणवल्यास कृपया आपल्या डॉक्टरांकडून दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावेत. कोणतेही घरगुती उपाय करीत वेळ वाया घालू नये. डांग्या खोकला असल्यास उपचारासाठी डॉक्टर अँटिबायोटिक्स औषधे देतील. शिवाय खोकला, ताप ही लक्षणे कमी करण्यासाठीही औषधे देतील.

(सोशल मीडियावरुन साभार)