जेवल्यानंतर काही तासांनी भुक का लागते?

आरोग्य

सकाळी उठल्यानंतर दूध पिऊन तुम्ही शाळेत जाता. मग मधल्या सुट्टीत आईने दिलेला डवा खाता. तरी परत शाळा सुटल्यावर घरी जाईपर्यंत तुमच्या पोटात कावळे ओरडायला लागतात. हा अनुभव तुम्ही सगळ्यांनीच घेतला असेल.

दुपारी भरपेट जेवल्यावर पुन्हा रात्री भूक लागतेच. असे का होते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. माणसाच्या मेंदू मध्ये भूक, तहान याची केंद्रे असतात. पोटात काही नसताना पोटातील (जठरातील) चेतातंतू मार्फत ती संवेदना मेंदूच्या भुकेच्या केंद्रापर्यंत जाते. त्याच वेळी जठरात स्रवलेले हायड्रोक्लोरीक आम्ल, गॅस्ट्रीन व पूर्ण पचनसंस्थेत निर्माण होणारी इतर संप्रेरके यांच्या एकत्रित परिणामामुळे भुकेची जाणीव होते. कितीही भूक लागली तरी आपण ठराविक अन्नच खाऊ शकतो. त्यामुळेच आपल्याला रोज जेवावे लागते.

जठरात अन्न दोन ते अडीच तास राहते. जठराच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसरणामुळे अन्न घुसळले जाते व त्यावर आम्ल आणि विकरांची प्रक्रिया होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही प्रमाणात पचलेले हे अन्न लहान आतड्यात जाते. जठरात अन्न काही ठराविक काळच (दोन ते अडीच तास) राहते. त्यानंतर जठर रिकामे होते.

जठर रिकामे झाल्यानंतर व अन्न पचनसंस्थेत पुढे सरकल्यानंतर आपल्याला पुन्हा भूक लागते. साहजिकच जेवल्यानंतर काही तासांनी पुन्हा भूक लागते. अन्नाचे पूर्ण पचन होऊन चोथा (विष्ठा) बाहेर पडायला १६ ते १८ तास लागतात.

(शोशल मीडियावरुन साभार)