सूर्यनमस्कार का घालायचे…?

आरोग्य

आपल्याला शाळेत आठवी, नववी मध्ये शरीर शास्त्रात शिकवले आहे की, आपल्या पोटात मराठीत जठर, यकृत म्हणजे लिव्हर, प्लिहा, स्वादुपिंड, लहान आंतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे.

आता विचार करा. देवाने, निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व २२ फूटाचे आतडे कसे बसविले असेल? २२ फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा Volume किती? हे कसे? विचार चालेना!

एक दिवस एक फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो, प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर, पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व प्रसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सूर्यनमस्कारात ते होते.

सूर्यनमस्कारात आपण खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर उजवा पाय दुमडतो व डावा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करुन आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना डावा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लँडला व स्रियांना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो.

दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी १० ते १२ सूर्यनमस्कार घातले, तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो हा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेलच.

सूर्यनमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते.दररोज १२ ते १५ सूर्यनमस्कार घालायला १० ते १५ मिनीटे लागतात. सुर्योपासनाही होते. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या-येण्याचा वेळ आणि खर्चही वाचतो.

सूर्यनमस्कारातील सूर्याच्या बारा नावांचा अर्थ…

१) ॐ मित्राय नमः ‘सूर्यावर आमचे, निसर्गाचे, पृथ्वीचे जीवन अवलंबून आहे. काळाची परिवर्तने तो घडवून जीवन देतो म्हणून मित्र.

२) ॐ रवये नमः रवि म्हणजे श्रेष्ठ. सर्व तेजांत सूर्य सर्वाधिक तेज देतो आणि तेजस्वी बनवतो म्हणून रवि.

३) ॐ सूर्याय नमः सूर्य म्हणजे प्रगती, पराक्रम.

४) ॐ भानवे नमः वैभव देतो आणि वैभव राखतो तो भानू.

५) ॐ खगाय नमः सूर्यमालेतील सगळ्या ग्रहांना तोलून धरतो, सावरतो, गती देऊन अंतरिक्षात फिरतो; म्हणून तो खग. या गतीमुळेच दिवस, रात्र, ऋतू, अयन, संवत्सर असे कालचक्र निर्माण होते; म्हणूनच तो खग.

६) ॐ पुष्णे नमः पुष्टी देतो तो पूषन्. अन्न-वस्त्र समृद्धी देतो तो पुषन्.

७) ॐ हिरण्यगर्भाय नमः विश्वगोलाला कवटाळून असलेल्या ब्रह्मांडाची जाण देतो तो हिरण्यगर्भ. ब्रह्मांडाचा अल्पसा अंश अशा या आमच्या पृथ्वीवरचा परमात्मा तो हिरण्यगर्भ. हिरण्य म्हणजे ब्रह्मांडाचे सारसर्वस्व. तो सूर्यदेव हा हिरण्यगर्भ.

८) ॐ मरीचये नमः किरणे विस्तारीतो तो मरीची. सूर्यकिरणे नाना वर्णांची, नाना गुणधर्मांची असतात. काही किरणे अन्नधान्य पिकवतात, काही जीवनसत्त्वे आणि जीवन देतात, काही रोगजंतू नष्ट करतात, तर काही जीवनाला ऊर्जा पुरवतात; म्हणून तो मरीची.

९) ॐ आदित्याय नमः पृथ्वीवरच्या सर्व ऊर्जा आणि घडामोडी यांचे मूळ सूर्य आहे. ते मूळ, ते मूलत्व प्रकाशित करतो, तो आदित्य.

१०) ॐ सवित्रे नमः चेतना जागवतो, प्रेरणा देतो आणि परमात्मज्ञान देतो, तो सवितृ. वेदातील सर्वश्रेष्ठ, गायत्रीमंत्राची देवता, तो

११) ॐ अर्काय नमः वेदमंत्रांना ‘अर्क’ म्हणतात. वेदांना ॐ ची (ॐ मधूनच वाणी प्रकटली) प्रेरणा देतो, तो अर्क.

१२) ॐ भास्कराय नमः प्रकाश, प्रज्ञा, प्रतिभा देतो, तो भास्कर