प्रगतशील शेतकरी प्रकाश मेचे यांचा गौरव
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे गावाने पुन्हा एकदा बैलगाडा स्पर्धांच्या क्षेत्रात आपली शान सिद्ध केली आहे. येथील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक व प्रगतशील शेतकरी प्रकाश बबन मेचे यांच्या बैलगाडा स्पर्धेतीलशिल्या या बैलाची तब्बल ११,११,१११ रुपयांना विक्री झाला असून, ही बातमी संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरली आहे.
सदर बैलाने अनेक नामांकित बैलगाडा शर्यतीत उत्कृष्ट कामगिरी करत प्रकाश मेचे यांना गौरव मिळवून दिला आहे. या बैलाची ताकद, वेग, आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण यामुळे तो शर्यतीच्या मैदानात सतत चर्चेचा विषय ठरत होता. अखेर सलगर ग्रुप बैलगाडा संघटना अजित ज्ञानेश्वर काळजे व अक्षय ज्ञानेश्वर काळजे (चर्होली) यांनी सदर बैलाची किंमत थेट १,११,१११ रुपये देत बैल खरेदी केला आहे. या बैलाची सविंदणे गावात वाजत गाजत मिरवणूक काढत रवानगी करण्यात आली. यावेळी बैलगाडा मालक व बैलाला ही अश्रू अनावर झाले होते.
या सौद्यामुळे प्रकाश मेचे यांच्या मेहनतीचे व बैल संवर्धनातील योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बैल जोपासना, खुराक, आणि नियमित प्रशिक्षण यामुळेच आज या बैलाला इतकी मोठी किंमत मिळाली असल्याचे मत स्थानिक बैलगाडा शौकिनांनी व्यक्त केले आहे.
प्रकाश मेचे हे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शेती करत असून, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबत प्राचीन कृषी संस्कृतीचा संगम साधून आपली बैलगाडी स्पर्धेतील ओळख तयार केली आहे. त्यांच्या बैलगाड्याची जिल्हाभरात ओळख असून, त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके देखील पटकावली आहेत.
ही विक्री केवळ आर्थिक व्यवहार नसून, ही एक प्रकारे ग्रामीण कृषी संस्कृतीची जपणूक व बैल संवर्धनाच्या परंपरेला दिलेला सलाम मानला जात आहे.शिरूर तालुका व सविंदणे गावातील बैलगाडा शौकिन व ग्रामस्थांनी या विक्रीबद्दल आनंद व्यक्त करत प्रकाश मेचे यांचे अभिनंदन केले असून, त्यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार अनेकांनी काढले.