भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

मुंबई: कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक यांच्यासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.ही घटना विभागाची प्रतिमा मलिन करणारी आहे.या भ्रष्टाचार प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ही दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत कठरे, कनिष्ठ लिपिक अनिल जोग आणि स्टेनो प्रवीण शिवाजी गुरव या तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचप्रकरणी कारवाई केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. उच्च शिक्षण विभाग हा विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारा विभाग आहे, अशा प्रकरणामुळे शासनाची प्रतिमा मलीन होते.या भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. त्यांच्यावर विभागांतर्गत सुद्धा कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.