पोलिस भरतीची २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु!

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.

एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची हे ठरवायचे आहे. कोणत्याही उमेदवारांना दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहणार असून भरतीत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजीला वाव राहणार नाही, असे तगडे नियोजन करण्यात आले आहे.

जेथे मैदानी चाचणी तेथेच लेखी परीक्षा

उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जणार आहे. परंतु, उमेदवाराने ज्या शहरात-जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याचठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.

गैरप्रकारावर ‘सीसीटीव्ही अन्‌ व्हिडिओ’ वॉच

मैदानी चाचणी सर्वच उमेदवारांची होईल, त्यातून प्रत्येकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. तसेच प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना पोलिस महासंचालकांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.