लग्नानंतर पत्नीचा नकार; ७ महिने १६ दिवसांत न्यायालयाकडून विवाह रद्द

महाराष्ट्र

पतीने मानसिक धक्का बसल्यानंतर घेतली न्यायालयाची धाव

मुंबई: देवाब्राह्मणांच्या साक्षीने व वाजतगाजत पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या विवाहानंतर अवघ्या काही दिवसांत पत्नीने नवरा पसंत नसल्याचा पवित्रा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आई-वडिलांच्या दबावाखाली लग्न केल्याचे पत्नीने लग्नानंतर तिसऱ्या दिवशीच स्पष्ट केल्याने पतीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. अखेर न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर अवघ्या ७ महिने १६ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाने विवाह रद्द करण्याचा आदेश दिला.

राकेश (वय २७) आणि स्मिता (वय २४) (नावे बदललेली) असे या दाम्पत्याचे नाव आहे. राकेश हा व्यावसायिक असून स्मिता गृहिणी आहे. दोघांचा विवाह जून २०२४ मध्ये पारंपरिक पद्धतीने झाला होता. मात्र लग्नानंतर पतीने वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता, पत्नीने थेट नकार दिला. नवरा पसंत नसल्याचे सांगत तिने वैवाहिक जीवन स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली.

लग्नानंतर केवळ २० दिवसांत स्मिता माहेरी गेली आणि त्यानंतर ती परतलीच नाही. पत्नीच्या या भूमिकेमुळे मानसिक तणावाखाली गेलेल्या राकेशने ॲड. राहुल जाधव यांच्यामार्फत मे २०२५ मध्ये न्यायालयात धाव घेतली. पत्नीचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध झाल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा विवाह रद्द करण्याचा आदेश दिला.

कधी करता येतो लग्न रद्द करण्यासाठी अर्ज?

हिंदू विवाह कायद्यातील कलम ५ मध्ये विवाहासाठी आवश्यक अटी नमूद करण्यात आल्या आहेत.

या अटींचे पालन न झाल्यास:

कलम ११ आणि १२ अंतर्गत विवाह रद्द करण्यासाठी अर्ज करता येतो

असा अर्ज लग्न झालेल्या तारखेपासून एका वर्षाच्या आत करणे बंधनकारक असते

अर्जावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालय निर्णय देते