मुंबई (शीतल करदेकर): आक्रमक विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी’ असेच काहीसे चित्र पावसाळी अधिवेशनात सलग तिसऱ्या दिवशीही दिसले. आमदार अपात्रतेबाबतचा, दागी मंत्री व आमदार भाजपासोबत जाऊन शुर्चिभूत झाले काय…? हातपाय तोडण्याची जाहीर भाषा करणारे आमदार प्रकाश सुर्वे, सरकारी कर्तव्यात असणाऱ्यांवर हात उचलणारे आमदार संतोष बांगर, मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेवरील अधिकाराबाबत कोर्टात चाललेली लढाई या सर्व पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे पारडे कमजोर झाल्याचे दिसले. अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विधानपरिषदेत उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना ज्याप्रकारे शिस्तपालनासाठी ताकीद दिली ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली.
माजी मंत्री नबाव मलिक, अनिल देशमुख तुरुंगात आणि फोन टॅपिंग प्रकरणातील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला थेट नवीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर, तिथेही त्या ईडीचे दूत बनून विरोधकांचे जेलवारीचे नंबर जाहीर करुन एकप्रकारे दबावतंत्र वापरणाऱ्या मोहित कंभोज यांच्याशी बोलताना चॅनलभर दिसल्या. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसेनेच्या तोफेचा आवाज बंद करण्यासाठी नियोजनबद्धपणे अटक झाली. ईडीच्या जाळ्यात मविआचे नेते आणि ज्यांच्यावर संजय राऊत यांनी व माजी मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केलेत, पुरावे दिलेत, ते सगळेच केंद्रीय यंत्रणाच्या तडाख्यातून दूर “सुखेनैव निर्लेप” असल्याप्रमाणे वावरत आहेत. सत्तेत आल्यावर, मविआ सरकारच्या एप्रिल २०२१ पासूनच्या निर्णयाला स्थगिती देऊन जनहिताच्या कामी खिळ घालणारे शिंदे सरकार…भावनेच्या भरात जे काही निर्णय घेत आहे ते पहाता इथे ही कारवाई पूर्ण आकसाने केली म्हणण्यास वाव आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. मुंबई वर शिवसेना भाजपाचा भगवा फडवण्याची सर्व तयारी भाजपा करतेय, तसे असले तरी वाट अवघड आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देणे,गोविंदा ना सरकारी नोकरीत आरक्षण देणे हे प्रगल्भतेचे,दूरदर्शी नेतृत्वाचे लक्षण नाही हे नक्की.
…पालघर हत्तीरोग नियंत्रण विषयावर
नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का..? माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अशा प्रश्नांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत गोंधळले सभागृहात एकच हशा पिकला त्यानंतर माहिती घेऊन देतो इतपत बोलले.
तसेच ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, पन्नास खोके, माजलेत बोके, पन्नास खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, आले रे आले गद्दार आले अशा जोरदार घोषणा देत पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
…तर मुख्यमंत्री सुध्दा थेट जनतेतून निवडून द्या
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय लोकशाहीसाठी घातक; थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयाला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला कडाडून विरोध केला,थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडल्याने शहराच्या विकासावर परिणाम होतो. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था या आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्याइतका सुध्दा पैसा नाही. त्यामुळे शहरांचा विकास रखडला आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय घेतल्यास नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकण्याचे प्रकार वाढीला लागतील. तसेच या प्रक्रियेत मनी आणि मसल पॉवर असणारी विकृती वाढीला लागेल. यापूर्वी सुध्दा अनेक वेळा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचे निर्णय घेण्यात आले होते, काही काळासाठी ते राबविले सुध्दा होते. मात्र अनेक ठिकाणी थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एका विचाराचा आणि सभागृहात सदस्यांचे बहुमत दुसऱ्या विचाराचे असे प्रकार झाले होते. त्यामुळे शहराच्या विकास कामात आणि निर्णय प्रक्रियेत एकमत होत नाही. त्याचा परिणाम संबंधित शहराच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे कोणत्याही विषयीचा भावनिक निर्णय न घेता, तो पूर्णपणे व्यवहारी पातळीवर पडताळून घेणे आवश्यक असते असेही पवार म्हणाले.
तसेच थेट नगराध्यक्ष निवडीवर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर जयंत पाटील यांचा आक्षेप घेत कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते…? असा टोला माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहात एकनाथ शिंदे यांना लगावला. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच हे विधेयक अस्तित्वात येणे कसे चूक आहे यासाठी वकिली केली होती. त्यावेळी त्यांचा उत्साह इतका होता की आम्हीही प्रभावित होऊन त्यांच्या सूचनेला पाठिंबा दिला. त्यांनी इतकी चांगली वकिली केली की देवेंद्र फडणवीसही त्यांना विरोध करू शकले नाही. आज ते पुन्हा सांगत आहेत की थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडायचे यावर जयंत पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.
शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत: नाना पटोले
राज्यात ओला दुष्काळाची स्थिती आहे पण सरकार मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. भरीव मदत देऊन राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा संदेश गेला पाहिजे. पण सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे. शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे सरकार आहे. विधानसभेत प्रश्न उपस्थित करूनही सरकार उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे, असेही पटोले यांनी पत्रकाराशी बोलताना सागितले.
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूच्या सखोल चौकशीसोबतच महामार्गावरील अपघात व मृत्यू टाळण्यासाठी कार्यवाही व्हावी..अशी *विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून अजित पवार यांची सूचना केली.तर मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातस्थळे शोधून दोष दूर करुन मुंबई-पुणे महामार्ग आठपदरी करण्याबाबत सकारात्मक विचार करु असे अजित पवार यांच्या प्रश्नानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यामुळे विधानसभेचे हे पावसाळी अधिवेशन कमी दिवसांचे असले तरी विरोधकाच्या अभ्यासपूर्ण तयार व आक्रमक विरोधाने गाजणार असेच सध्याचे चित्र आहे.